वाशिम, दि. ३0 : ग्रामीण भागात राहणार्या जनतेच्या विकासासाठी राबविण्यात येत असणार्या सर्व योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या सूचना खासदार तथा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या अध्यक्ष भावना गवळी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा)च्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह मानोरा पंचायत समितीच्या सभापती धनश्री रोठोड, कारंजा पंचायत समिती सभापती वर्षा नेमाने, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक के. एम. अहमद, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नसिरुद्दीन पटेल यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.खासदार गवळी म्हणाल्या की, जिल्ह्यात सुरु असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामांवरील मजुरांना वेळेत मजुरी दिली जावी. मजुरी अदा करण्यास विलंब झाल्यास संबंधित अधिकार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. सन २0१३ मध्ये अतवृष्टीमुळे खचलेल्या सिंचन विहिरींची दुरुस्ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही खासदार गवळी यांनी यावेळी दिल्या. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधील अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व तहसीलदार व गट विकास अधिकार्यांनी नियोजनपूर्वक प्रयत्न करावे. काही तालुक्यांमध्ये पेंडींग मस्टर्सचा प्रश्न उद्भवला आहे. याप्रकरणी संबंधित गट विकास अधिकारी व तहसीलदार यांनी समन्वयाने काम करून तातडीने पेंडींग मस्टर्सचा विषय निकाली काढावा.यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, इंदिरा आवास योजना यासह इतर योजनांचा आढावा घेण्यात आला.
ग्रामीण विकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा!
By admin | Updated: August 31, 2016 02:09 IST