बाल शिवाजी ग्रंथालय समितीच्या वतीने रिसोड शहरात कोरोना काळात सेवा देणाऱ्या कोरोना योद्धांचा प्रशस्तिपत्र शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विजयमाला आसनकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उद्योगपती उत्तमचंद बगडिया, ॲड.कृष्णा महाराज आसनकर, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अजय पाटील, डॉ.विजय प्रसाद तिवारी, पी.डी. पाटील यांची उपस्थिती होती. सुरुवातीला कोरोना योद्धांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये समता फाउंडेशन संपूर्ण टीम, पोलीस मित्रपरिवार, आर्ट ऑफ लिव्हिंग, नगरपरिषद आरोग्य विभाग, तालुका आरोग्य विभाग, विद्युत वितरण कंपनी, ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय, पोलीस पाटील व नगरसेवक यांचा समावेश होता.
यावेळी माजी कृषी अधिकारी संजय उखळकर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे राजू इंगोले, समता फाउंडेशनचे तानाजी गोंड यांनी मनोगत व्यक्त केले. नगराध्यक्ष आसनकर यांनी अध्यक्षीय भाषणातून रिसोड येथील लसीकरणाचा पॅटर्न अवघ्या महाराष्ट्रात चर्चेत असल्याचे सांगितले. सर्वांच्या सहकार्यामुळे ही मोहीम सहजरीत्या पूर्ण करू शकलो. त्यात रिसोडकरांचा मोलाचा वाटा आहे, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे संचालन रवि अंभोरे यांनी करून, आभार मानले.