दोनद बु. ग्रामपंचायतमध्ये सरपंच निरंजन करडे व सदस्यांनी शेतकरी व बचत गटांच्या मेळाव्याचे आयोजन केले. या कार्यक्रमातून गावकरी, शेतकऱ्यांसह महिला बचत गटांना स्पर्धेची संपूर्ण माहिती देण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार, गटविकास अधिकारी कालिदास तापी, आत्माचे समन्वयक पाटील, तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके आदी अधिकाऱ्यांनी उपस्थितांना स्पर्धेची माहिती देतानाच बचत गटाची स्थापना आणि त्याच्या फायद्याबाबतही मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार यांनी गाव समृद्ध करण्यास महिलांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, ते सांगितले.
------
करदात्यांना वॉटर कॅनची भेट
दोनद येथे शेतकरी, बचत गट मेळाव्यासोबतच करदात्यांच्या सत्कार कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. यात ज्या करदात्याने ५ हजार रुपयांपर्यंतचा कर भरला. त्या करदात्यांना गटविकास अधिकारी कालिदास तापी यांच्या हस्ते ३० लिटर क्षमतेची वॉटर कॅन भेट देण्यात आली. या उपक्रमालाही गावकऱ्यांचा प्रतिसाद लाभल्याने ग्रामपंचायतची मोठ्या प्रमाणात करवसुलीही झाली.
---------
‘उमेद’सह गांडूळ खताबाबत मार्गदर्शन
समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत आयोजित कार्यक्रमाला गावातील सर्व महिलांनी हजेरी लावली. यात बचत गट कसा स्थापन करावा, त्याचे फायदे काय, याविषयी ‘उमेद’च्या तालुका व्यवस्थापक आरती अघम व वर्षा ठाकरे यांनी सविस्तर माहिती दिली, तसेच तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी महिलांना गांडूळ खतासह संबंधित योजनेविषयी माहिती दिली.
----------
पिंप्री येथे सांस्कृतिक कार्यक्रम
उंबर्डा बाजार : पिंप्री (वरघट) येथे २६ ते २८ जानेवारीदरम्यान चिमुकल्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुला-मुलींनी आनंदाने सहभाग घेत नृत्याविष्कार सादर केला, तसेच भाषण, कविता व आपल्या कलेचे सादरीकरण केले.
----------
निलगायींकडून गहू पीक उद्ध्वस्त
उंबर्डा बाजार : परिपक्व स्थितीत असलेल्या गहू पिकात निलगायींनी हैदोस घालून शेतकऱ्यांचे नुकसान चालविले आहे. यात एका शेतकऱ्याच्या शेतातील अर्धा एकर क्षेत्रातील गहू पीक उद्ध्वस्त केले. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.