संतोष मुंढे / वाशिममहसूल वर्षाचा पहिला दिवस महसूल दिन. यादिनी महसूल खात्याशी संबंधित यंत्रणेला अपेक्षित बाबींचा निवाडा होणे अपेक्षित; परंतु हा दिन साजरा करताना शासनाने अपेक्षिलेल्या मूळ उद्देशापासून भरकटत असल्याचे चित्र या दिवशी आयोजित होणार्या उपक्रमावरुन समोर येत आहे.जसे १ एप्रिल ते ३१ मार्च हे आर्थिक वर्ष; तसेच १ ऑगस्ट ते ३१ जुलै हे महसूल वर्ष. या कालावधीच्या शेवटी वर्षभरातील महसूल आकारणी व वसुली यांचा ताळमेळ घेण्याचे काम महसुली यंत्रणेकडून केले जाते. त्यामुळे प्रत्येक नवे महसूल आकारणी व वसुलीचे उद्दिष्ट घेऊन राज्यातील सहा विभागीय आयुक्त कार्यालये, ३५ जिल्ह्ये, ३५८ तालुके, १८0 उपविभागीय अधिकारी कार्यालये, १५६४ महसूल मंडळे, तर १२ हजार ३६७ तलाठी साज्यात कार्यरत महसूलचे अधिकारी, कर्मचारी नव्या जोमाने काम करत असतात. दरवर्षी दिलेल्या उद्दिष्टाची पूर्तता करणार्या या यत्रणेतील कार्यरत अधिकार्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या अपेक्षांच्या ओझ्यातून उतराई होण्याची संधी शासनाला मिळावी म्हणून दरवर्षी १ ऑगस्टला महसूल दिन साजरा केला जावा, अशी संकल्पना पुढे आली. या संकल्पनेत महसूलच्या कार्यरत यंत्रणेला पुढील उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी ऊर्जा मिळणारे काम महसूलदिनी व्हावे, हे उद्दिष्ट डोळ्य़ासमोर ठेवून राज्य शासनाने १९ जुलै २00२ रोजी महसूल दिन आयोजनासंदर्भात पहिले परिपत्रक काढले. या परिपत्रकानंतर महसूल दिन साजरा करणे सुरु झाले; परंतु आयोजन नेमके कसे करावे, याबाबत संबंधित गोंधळात असल्याने वर्षातील ३६४ दिवसात जी कामे ही यंत्रणा करते तीच कामे मेळावे, प्रत्यक्ष दारी जाऊन व्यापक प्रमाणात करण्यावर भर दिला गेला. त्यानंतर शासनाने महसूल दिनासंदर्भात २२ जुलै २00४ रोजी सुधारित परिपत्रक काढले. या परिपत्रकातही शासनाने महसूल दिनाचे महत्त्व अधोरेखीत करुन महसुली कामासाठी झटणार्या यंत्रणेचे कल्याण चिंतीले; परंतु गेल्या कित्येक वर्षाच्या कारकिर्दीत महसूल यंत्रणेशी संबंधित व्यक्तीचे प्रश्न कायम आहेत. दरवर्षी त्याच मागण्या तेच प्रश्न घेऊन न्याय हक्कासाठी निदान महसूलदिनी तरी न्यायोचित निर्णय होणे यंत्रणेशी संबंधित सर्व घटकांना अपेक्षित आहे. निदान महसूलदिनी तरी कर्मचारीभीमूख कार्यक्रम राबविणे अपेक्षित आहे. दिवसागणिक येणार्या नवीन योजना, कर्मचार्यांवर वाढलेला कामाचा ताण याचा विचार करता शासनाच्या महसूल खात्याकडून यंत्रणेतील घटकाकडे आपली संपत्ती म्हणून तिला पोषक कार्य राबविणे आवश्यक आहे. तसे कुठेच होताना दिसत नाही. वाशिम तहसीलने मात्र याकामी पुढाकार घेतला असून, वरिष्ठांच्या मार्गदर्शनात १ ऑगस्टला महसूल कर्मचार्यांसाठी आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. याला व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी शासन स्तरावर पुढाकार घेण्याची खरी गरज आहे. तहसीलदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशीष बिजवल यांनी शासनाला अभिप्रेत उपक्रम महसूलदिनी राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात असल्याचे सांगीतले. या दिवशी जनोपयोगी कार्य व सत्कार समारंभाबरोबरच महसुली यंत्रणेतील घटकाला सर्वार्थाने सशक्त करण्यासाठी यावेळी आरोग्य मार्गदर्शन, रक्तदान, योग शिबिराचे आयोजन केले. याचा महसुली यंत्रणेला बळकटी देण्यासाठी उपयोगच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भरकटतोय महसूल दिन !
By admin | Updated: August 1, 2014 02:19 IST