वाशिम : विदर्भ सधन सिंचन कार्यक्रमांतर्गत तुषार संचाची शासनमान्य दरापेक्षा जादा दराची खोटी बिले शेतकर्यांना देऊन शेतकर्यांकडून जादा रक्कम वसूल करून फसवणूक केल्याबद्दल जैन इरिगेशन कंपनीचे वितरक विजयकुमार दगडुलाल सोमाणी यांच्यावर २६ जुन रोजी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये भादंविचे कलम ४२0 व ४६३ अन्वये फसवणूकीचे गुन्हे दाखल केले.जागतिक स्पर्धात्मक निविदा तत्वावर महाराष्ट्र शासनाने निविदा स्विकारल्या. त्यानुसार ३0 नगाच्या संचाची किंमत व्हॅटसहित रू.२५,४0५ रू. होते. परंतू जैन इरिगेशन कंपनीचे वाशिम येथील वितरक विजकुमार दगडुलाल सोमाणी यांच्या उज्वला इरिगेशन एजन्सी, सोमाणी कार्यहाऊस, रिसोड रोड, वाशीम येथील विक्री केंद्रास २६ जून रोजी कृषी अधिकार्यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान सोमाणी यांनी शेतकर्यांना तुषार संचाची विक्री शासनामान्य दरापेक्षा जादा रक्कमेची आकारणी करून केल्याचे निदर्शनास आले. सदर संचाचे अनुदान प्रस्तावासाठी तालुका कृषी अधिकारी यांचेकडे देयक मात्र, शासन मान्य दराने देऊन शेतकर्यांना जादा रकमेचे बिल दिले.तसेच शासन मान्य दराप्रमाणे दिलेले बिल व शेतकर्यांना दिलेले बिल हे एकाच क्रमांकाचे तयार करून, खोटे दस्ताऐवज तयार केल्याचे स्पष्ट दिसून आले. सदरच्या विक्री पश्चात सेवा केंद्राच्या करारनाम्यामध्ये लिहिल्याप्रमाणे सर्व साहीत्य शासन मान्य दराप्रमाणे विक्री करण्याची हमी घेतली असतानासुध्दा जादा रक्कम शेतकर्यांकडून वसूल करून घेऊन करारनाम्यातील अटीचा भंग केला आहे. त्यामुळे संबधिताने भारतीय दंड विधानाच्या कलम ४२0 व ४६३ चे उल्लंघन केल्याबाबत तालुका कृषी अधिकारी मदन शिसोदिया यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलिस उपनिरिक्षक कल्पना राठोड यांनी सोमाणी यांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
फसवणूक प्रकरणी व्यापार्यास अटक
By admin | Updated: June 28, 2014 23:45 IST