वाशिम : मानोरा तालुक्यातील अडाण मध्यम प्रकल्पासाठी घोटी, वाघोळा, म्हसणी, तोरणाळा आणि दिघी या पाच गावांचे पुनर्वसन करण्यात आले; परंतु त्याबदल्यात मिळणाऱ्या अनेक सुविधांपासून या गावातील प्रकल्पबाधित नागरिक व शेतकरी अद्याप वंचित आहेत. जिल्ह्यात १२२ लघू आणि तीन मध्यम प्रकल्प आहेत; मात्र मानोरा तालुक्यात येणारा अडाण प्रकल्प नावापुरताच असून या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा यवतमाळ जिल्ह्यातील गावांना होतो. या प्रकल्पामुळे मानोरा तालुक्यातील तोरणाळा, म्हसणी आणि वाघोळा या तीन गावांमधील शेतजमिनी संपादित करण्यात आल्या. तसेच गावांचेही पुनर्वसन करण्यात आले. दिघी आणि घोटी या गावांचे शंभर टक्के पुनर्वसन झाले; तर घोटी या गावाला जमदरा या गावात समाविष्ट करण्यात आले. म्हसणी हे गाव अडाण प्रकल्पाच्या भिंतीलगत होते. त्या भिंतीला तडे जात असल्याने प्रकल्प फुटण्याच्या भूतीपोटी म्हसणी गावाचे १९८४ मध्ये पुनर्र्वसन झाले. या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या प्रकल्पात कवडीमोल भावात संपादित करण्यात आल्या; मात्र म्हसणीसह इतर चार गावे विकासापासून अद्याप वंचित आहेत. याशिवाय अडाण नदीवरचा प्रकल्प वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात उभारण्यात आला असला तरी, त्याचा अधिक फायदा यवतमाळ जिल्ह्यातील गावांनाच होतो. त्यामुळे प्रकल्पासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये रोषाचे वातावरण आहे. जलसंपदा विभागाने यावर प्रभावी तोडगा काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.
अडाण प्रकल्पामुळे बाधित पाच गावांचा प्रश्न ‘जैसे थे’!
By admin | Updated: April 18, 2017 01:20 IST