गावात राबविण्यात आलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेत गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गावाचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करून गाव कोरोनामुक्त करण्याचा ध्यास आता गावातील नागरिकासह ग्रामदक्षता समितीने घेतला आहे. कोरोना विरुद्धचा लढा जिंकण्यासाठी आपले गाव कोरोनामुक्त करण्यासाठी गावातील प्रत्येक नागरिकांनी कंबर कसली असून २० ऑगस्ट रोजी झालेल्या लसीकरण शिबिरात एकूण ५०१ नागरिकांनी कोरोना लस घेतली आहे. यासाठी गावातील नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लसीकरण शिबिर चालू असताना वाशिमचे तहसीलदार विजय साळवे, गटविकास अधिकारी प्रमोद बदरके, नोडल अधिकारी सुभाष कव्हर यांनी भेट देऊन या कार्याचे कौतुक केले. गावातील नागरिकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून ते उत्साहीत झाले होते. यावेळी त्यांनी कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याबाबत उपस्थित नागरिकांना सूचित केले व कोणतीही तमा न बाळगता सर्व पात्र लोकांनी आपले स्वतःचे लसीकरण करून घेण्याबाबत आवाहन केले व कोरोना लसीकरणाबाबत माहिती दिली.
गावातील नागरिकांच्या मनात लसीकरणाविषयी पसरलेल्या विविध अफवांमुळे जनतेच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर सारून १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे ध्येय गाठण्याच्या हेतूने ग्राम दक्षता समितीच्या पुढाकाराने व्यापकस्तरावर लसीकरण जनजागृती मोहीम गावात राबविण्यात आली. ही मोहीम राबविण्यासाठी ग्राम दक्षता समिती मोठे प्रयत्न करीत आहे.
या समितीला जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुधीर कव्हर, सरपंच ज्योती अर्जुन कव्हर, ग्रामविकास अधिकारी श्याम बरेटीया, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय काळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
२० ऑगस्ट रोजी पार पडलेल्या कोरोना लसीकरण शिबिरामध्ये ग्राम दक्षता समितीमधील सर्व आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, जिल्हा परिषद शाळेतील सर्व कर्मचारी, उमेद अंतर्गत काम करणारे बचत गट प्रतिनिधी, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, कृषी सहायक, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम पंचायत कर्मचारी, कोतवाल इत्यादी सर्व अहोरात्र परिश्रम घेऊन लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करीत आहेत.