लोकमत न्यूज नेटवर्कपार्डी ताड: गेल्या तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे खरिपाची पिके संकटात असल्याने शेतकऱ्यांना पिके जगविण्यासाठी पावसाळ्यातच सिंचनाचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र पार्डी ताड परिसरात पाहायला मिळत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे यंदा मृगाच्या सुरुवातीला जोरदार पाऊस पडला. तालुक्यातील पावसाच्या सरासरीत पार्डी ताड आघाडीवर होते. त्यामुळे जूनच्या अखेरपर्यंतच या परिसरातील खरीप पेरणी जवळपास आटोपली. सुरुवातीच्या पावसाचा जोर असल्यामुळे या कालावधित पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे बियाणे उगविले आणि पिकेही डोलू लागली; परंतु पिके जोर धरत असतानाच पावसाने दडी मारली. गेल्या २० दिवसांपासून परिसरात पावसाचा पत्ताच नाही. या परिसरातील जवळपास ४०० एकरहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली असून, हे पिक पावसाअभावी सुकत असल्याने पाण्याची सोय असलेले शेतकरी तुषार सिंचनाचा वापर करून पिकांना पाणी देत आहेत.
पावसाळ्यात घ्यावा लागतोय तुषार सिंचनाचा आधार
By admin | Updated: July 14, 2017 01:46 IST