मंगरुळपीर: तालुक्यातील तर्हाळा येथे शुक्रवारी ४ वाजताच्या सुमारास प्रमोद जनार्धन गावंडे, विनोद जनार्धन गावंडे यांच्या घराला अचानक लागलेल्या आगीत जवळपास चार ते पाच लाखांचे नुकसान झाले. ही आग लागल्यानंतर गावात पाणी नसल्यामुळे नागरिक आग विझवू शकले नाहीत. त्यामुळे संपूर्ण घरातील साहित्य खाक झाले. तर्हाळा येथील प्रमोद जनार्धन गावंडे व विनोद जनार्धन गावंडे यांच्या घराला शॉट सर्कीटमुळे आग लागली. आग घरातील गॅस सिलिंडर जवळ पोहोचल्यानंतर सिलिंडरने पेट घेतल्याने भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण गाव हादरले. यावेळी घरातील प्रमुख व्यक्ती व पाहुणे मंडळी, लहान मुले होती. आग लागताच घरातील सर्व जण बाहेर पडले. त्यामुळे जीवितहानी टळली. आग लागल्यावर गावातील लोकांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु आग विझविण्यासाठी पाणी नसल्याने मोठी कसरत करावी लागली. तर्हाळा येथे टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून, दोन दिवसांपासून टँकर बंद आहे, त्यामुळे पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. आजूबाजूच्या लोकांनी आपापल्या घरातून पाणी आणून आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. अग्निशामक दलाला पाचारण केल्यानंतर आग विझविण्यात आली. आगीत विनोद गावंडे यांच्या घरातील अंदाजे पाच लाखांचे साहित्य जळून खाक झाले. या आगीत घरातील कपडे, भांडी तसेच मौल्यवान वस्तू, महत्त्वाची कागदपत्ने जळून खाक झाली. सिलिंडरच्या भीषण स्फोटामुळे घरावरील स्लॅबला तडे गेले आहेत. घटनेनंतर नायब तहसीलदार साळवे व तलाठी पी.एन. गावंडे यांनी भेट देऊन पंचनामा केला.
त-हाळा येथे आग; पाच लाखांचे नुकसान
By admin | Updated: April 30, 2016 01:38 IST