रिसोड : येथील अकोला नाका परिसरातील नॅशनल सॉ मिलला शुक्रवार २७ च्या मध्यरात्री तीनच्या सुमारास शॉटसर्किट मधून लागलेल्या आगीत लाखो रुपयांची मालमत्ता खाक झाली आहे. याविषयी प्राप्त माहितीनुसार अकोला नाका परिसरात शेख हबीब शेख रफीक यांच्या मालकीची आरा मशीन संतोष साहेबराव नागरे यांनी भाडे तत्वावर चालविण्यास घेतली आहे.सदर मशीन असलेल्या हॉलमध्ये विद्युत फिटिंगमधून झालेल्या शॉट सर्किटने शुक्रवारच्या रात्री तीनच्या सुमारास अचानक आग लागली. मशीनमध्ये असलेली लाकडे लागलीच पेटली. पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले. शेजारील नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच परिसरातील सर्वच लहान मोठे आग विझविण्यासाठी शर्थीचा प्रयत्न करीत होते. शेजारीच राहत असलेले डॉ. दामोदर नवघरे यांनी स्वत:चा व खडसे, सलामभाई यांचा बोअर सुरु करुन पाईपद्वारे आगीवर पाणी टाकून विझविण्याचा प्रयत्न केला. थोडयाच वेळात नगर परिषदेची अग्निशमन गाडी येताच आग आटोक्यात आली. मशीनमध्ये आगीला पोषक सर्वत्र लाकडे असल्याने मोठय़ा प्रमाणात आग भडकली होती. या आगीत आरा मशीन चालक संतोष नागरे यांचे चार लाख सत्तर हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. सदर आग विझविण्याकरीता सतिश खडसे, बंडू ढोकरे, दीपक ढोकरे, श्यामसुंदर व्यवहारे, ईश्वर व्यवहारे, तुळशीराम नेमाडे, नसीरोद्दीन काझी, गिराम पोलीस, अशोक सरनाईक, रमेश वावरे, राजू भोपाळे, शालीग्राम खडसे, चाफेश्वर मंडळाचे पदाधिकारी धावून गेले.
शहरातील आरा-मशिनला आग
By admin | Updated: June 28, 2014 23:42 IST