किन्हीराजा(वाशिम), दि. २६- येथील वार्ड क्रमांक एकमधील रहिवासी जयनारायण जयस्वाल यांच्या राहत्या घरात अचानक शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत सोयाबीन, तूर तीळ या शेतमालासह दूरचित्रवाणी, वातानुकूलित यंत्र जळून खाक झाले. २६ मार्चला दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.वार्ड क्र. १मधील भर वस्तीतील कास्तकार व किराणा व्यापारी जयनारायण जयस्वाल हे परिवारासह दुपारी दीड वाजता भोजन करीत असताना अचानक घराला आग लागली. या आगीने काही सेकंदातच उग्र रूप धारण केले. त्यात घरातील सोयाबीन, तूर, तीळ आगीत जळून खाक झाले; तर टीव्ही, फ्रीज व घरातील इतरही साहित्य जळाले. घरातून धूर निघत असल्याचे पाहून शेजारीच राहणारे पठाण, सतीश इंगळे, नयन जयस्वाल, विजय जयस्वाल, अनिस पठान, गजानन बावने, सुनील गोदमले, राजू घुगे यांच्यासह शेकडो युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून घरातील लहान मुले व महिला-पुरुषांना सुखरूप घराबाहेर काढले. त्यामुळे जीवितहानी टळली. या घटनेत जयस्वाल यांचे सुमारे साडेतीन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती सतीश जयस्वाल यांनी दिली. मंडळ अधिकारी पी.एस. पांडे, प्रशांत गौरकर, शेषराव वानखेडे, विनोद नागरे, भगवान लांडकर, ताई अगुलधरे या महसूल विभागाच्या कर्मचार्यांसह जमादार गणेश बियाणी, संतोष कोहर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
घराला आग लागून साडेतीन लाखांचे नुकसान!
By admin | Updated: March 27, 2017 02:23 IST