कारंजा लाड (वाशिम): नगर परिषदेच्या येथील बंद पडलेल्या दवाखान्याची इमारत अतिशय जीर्ण झाली असून, प्रशासनाकडून दुरुस्तीची दखल घेण्यात येत नसल्याने ही इमारत अखेरच्या घटिका मोजत आहे. कारंजा नगर परिषदेकडून कित्येक वर्षांपूर्वी शहरातील रुग्णांच्या सोयीसाठी शहराच्या मध्यभागी एक अतिशय प्रशस्त आणि विविध सोयींनी परिपूर्ण असलेल्या दवाखान्याची इमारत उभारली होती. या इमारतीत प्रसूतिगृह, तपासणी कक्ष, उपचार कक्ष, शस्त्रक्रिया कक्ष, क्ष-किरण कक्ष, वैद्यकीय अधिकार्यांचे निवासस्थान आणि औषधी वितरण कक्ष तयार करण्यात आले होते. शहरात सुसज्ज आणि विविध सोयी-सुविधायुक्त अशा दवाखान्याची निर्मिती करण्यात आल्यानंतर या ठिकाणी रुग्णांना त्याच दर्जाची सेवाही मिळत होती. त्यामुळे शहरातील रुग्णांची या ठिकाणी उपचारासाठी रीघ लागायची. दरम्यान, शहरात काही वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णालय आल्याने या ठिकाणची सेवा बंद करून सुविधा हस्तांतरित करण्यात आल्या, तसेच या दवाखान्यात कार्यरत कर्मचार्यांना इतर विभागात सामावून घेण्यात आले. तथापि, या दवाखान्याची पुरातन महत्त्व असलेली इमारत वैभवाच्या जुन्या खुणा जपत होती.
कारंजा नगर परिषदेचा दवाखाना मोजतोय अखेरच्या घटिका
By admin | Updated: November 12, 2014 01:39 IST