जउळका रेल्वे : पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तोरणाळा येथील एका १५ वर्षीय मुलीशी बालविवाह करुन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणार्यासह नऊ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.यासंदर्भात जउळका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तोरणाळा येथील १५ वर्षीय मुलीने यासंदर्भात पोलिसात रितसर फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीनुसार गावातीलच सत्यविजय गोरे व चंचलाबाई गोरे यांच्यासह इतर सात जण मिळून नऊ जणांनी फिर्यादीसह तिच्या आजीला शेत व शेतात नवीन घर बांधून देण्याचे आमिष दाखवून सत्यविजयशी मंदिरात हार घालून तिचा विवाह लावून दिला. नंतर सत्यविजयने फिर्यादीशी १0 डिसेंबर २0१३ ते २७ ऑगस्ट २0१४ दरम्यान शारीरिक संबंध ठेवले; परंतु तिच्या नावाने घर वा शेती करुन दिली नाही. यासंदर्भात जीवे मारण्याची धमकीही दिली. पीडित फिर्यादीच्या तक्रारीवरुन सत्यविजय गोरे, चंचलाबाई गोरे, अधिक सात जणांविरुद्ध कलम ३७६, ३२३, ५0६, भादंवि, सहकलम बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा ५ (एल) ६ सहकलम बालविवाह प्रतिबंधक कायदा २00६ नुसार ९, १0 अन्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती जउळका पोलिसांनी दिली. याप्रकरणी सत्यविजय गोरेला अटक करण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सत्यविजय गोरेची न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.या खळबळजनक प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मानलवी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आरसेवार व त्यांचे सहकारी करीत असल्याची माहितीही जउळका पोलिसांनी दिली.
बलात्कार व बालविवाहप्रकरणी गुन्हा दाखल
By admin | Updated: August 29, 2014 01:43 IST