कोरोनाकाळात लॉकडाऊन असला तरी शेती कामे करण्यासाठी मुभा देण्यात आली असल्याने तालुक्यात पेरणीपूर्व मशागतीला सुरुवात झाली आहे.
खरीप हंगामात जून, जुलैमध्ये पेरणी होत असली तरी दोन महिन्यांपासून शेतीच्या कामांना सुरुवात करण्यात येत असते. जमिनीची सुपिकता वाढावी, याकरिता शेतातील काडी - कचरा उचलण्यात येतो. त्यानंतर ट्रॅक्टरद्वारे नांगरटी करून रोटावेटर मारून जमीन पेरणीसाठी एक महिना आधीच तयार करण्यात येते. त्यानंतर प्रतीक्षा असते ती दमदार पावसाची आणि एकदा दमदार पाऊस पडला की जून, जुलै महिन्यात पेरणीला सुरुवात होते. खरीप हंगामात तालुक्यात कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, सोयाबीन अशी पिके घेतली जातात, तर यामधून कपाशीचा पेरा मोठ्या प्रमाणात असतो. मागील दोन वर्षांपासून पाऊस दमदार पडतो तेव्हा चांगले पीक येईल, या आशेवर शेतकरी असतो; परंतु पाऊस जास्त प्रमाणात झाला की पिकांचे मात्र नुकसान होते व शेवटी शेतकऱ्याचा भ्रमनिरास होतो. सध्या पेरणीपूर्व मशागत सुरू असून, उन्हाचा पारा वाढलेला असल्याने सकाळी व संध्याकाळी शेताची कामे शेतकरी करीत असून, दुपारच्या वेळी विश्रांती घेत आहेत. शेतातील काडी-कचरा साफ करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. तर पूर्वी बैलांच्या साहाय्याने करण्यात येणारी कामे आता मात्र ट्रॅक्टरद्वारे करण्यात येत आहेत. डिझेलच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांनासुद्धा यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.