उमेद अंतर्गत इंझोरी येथील बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करून उत्पादन वाढविण्यासाठी प्रेरित करण्यासह रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने उमेद अंतर्गत ग्रामीण महिलांच्या बचत गटांसाठी प्रभागस्तरीय केंद्र सुरू करण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे हे अभियान राबविले जाते. या अभियानाचाच एक भाग म्हणून इंझोरी येथे एका दिवसासाठी प्रभागस्तरीय विक्री केंद्र कार्यान्वित करण्यात आले. बुधवार, १८ ऑगस्ट रोजी सुरू केलेल्या या विक्री केंद्राचे उद्घाटन जि. प. सदस्या वीणादेवी जयस्वाल यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या विक्री केंद्राचे आयोजन सोनल डोईफोडे तथा विजयाताई लांजेवार (सीआरपी) यांनी करून स्वयंसहायता समूहांनी तयार केलेल्या मालाच्या विक्रीसाठी प्रोत्साहन दिले. पापड, चकल्या, पापडा, तांदळाचे खिचे, रसायनविरहित धान्ये, सोजी, उपवासाचे विविध पदार्थ, यांसोबतच सॅनिटरी नॅपकीन्स विक्रीसाठी उपलब्ध होते. यावेळी इंझोरी ग्रामपंचायतचे सरपंच हिंमतराव पाटील, उपसरपंच शंकरराव नागोलकार, मनीषा दिघडे, राजकुमार दिघडे आणि गावातील महिला उपस्थित होत्या.
---------
५० महिलांचा सहभाग
इंझोरी येथील केंद्रात जीवनज्योती महिला दिव्यांग समूह, श्रीगणेश स्वयंसहायता समूह, जय जगदंबा समूह (दापुरा), एकता बचत गट, संतोषीमाता बचत गट, गौरी स्वयंसहायता समूह, राधेकृष्ण समूह, गुरुमाऊली समूह, ओम नमः शिवाय समूह, तसेच आई साडी सेंटर, गोपी मसाले हे गृहउद्योग सहभागी झाले होते. विक्री केंद्रामध्ये ११ स्टॉल लावत सुमारे ५० उद्योगी महिलांनी आपला सक्रीय सहभाग नोंदविला.