वाशिम : येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेमध्ये गेल्या १९ वर्षांपासून रोजंदारीवर शिपाई पदावर काम करणार्या ४४ वर्षीय इसमाला नोकरीतून कमी केल्यामुळे त्याने नैराश्येपोटी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २ फेब्रुवारीला सायंकाळी ५:३0 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेमध्ये सन १९९६ पासून विठ्ठल लक्ष्मण गाडेकर (रा. शिव चौक, वाशिम ) रोजंदारीवर शिपाई म्हणून अधून-मधून काम करीत होते. त्यानंतर सन २0११ पासून दर दिवशी रोजंदारीवर अधिकृत काम करीत होते. गेल्या आठ दिवसांपूर्वी महाराष्ट्र बँकेच्या व्यवस्थापनाने गाडेकर यांना रोजंदारीवर ठेवू नये, अशा सूचना संबंधित शाखेच्या व्यवस्थापकांना देण्यात आल्या. शाखा व्यवस्थापकांनी गाडेकर यांना कामावर न येण्याचे सांगितल्याने त्यांना मोठा धक्का बसला. या नैराश्येपोटी गाडेकर यांनी २ फेब्रुवारीला सायंकाळी ५:३0 वाजताचे सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वाशिम शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
नोकरीतून काढून टाकल्याने कर्मचा-याची आत्महत्या
By admin | Updated: February 4, 2016 01:22 IST