वाशिम : वीजपुरवठय़ाबाबत काही तांत्रिक बिघाड आला तर अधिकृत लाईनमन अथवा अभियंत्यांनी दुरूस्ती करणे बंधनकारक आहे. मात्र, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांश कामांवर खासगी व्यक्तिंनाच जुंपले जात असल्याचे वास्तव लोकमतने चव्हाट्यावर आणले आहे. विद्युत खांबावर चढलेले, डीपीमध्ये दुरूस्ती करीत असलेल्या खासगी व्यक्तिंचे दृश्य लोकमतच्या स्टिंगने २, ४ व ५ मे रोजी कॅमेर्यात कैद करून या जीवघेण्या प्रकाराचा भंडाफोड केला आहे. वीज पुरवठय़ाबाबतचा तांत्रिक बिघाड दुर करण्याची जबाबदारी वीज वितरण कंपनीने अधिकृत लाईनमन व अभियंत्यांवर सोपविलेली आहे. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये विद्युत दुरूस्तीची किरकोळ कामे काही लाईनमन व अभियंते खासगी व्यक्तिंमार्फत करून घेत असल्याची माहिती लोकमतला मिळाली होती. या माहितीची सत्यता पडताळण्यासाठी २ ते ५ मे दरम्यान वाशिम, रिसोड व मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात स्टिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
*मालेगाव तालुक्यातील मेडशी, रिधोरा, कुरळा, डव्हा, खिर्डा या परिसरात लाईनमन किंवा वीज वितरण कंपनीचे कर्मचारी खासगी व्यक्तिंकडूनच विद्युत दुरूस्तीची किरकोळ कामे करून घेतात. एका महिन्यापूर्वी मेडशी येथे लाईनमनने एका खासगी व्यक्तिला विद्युत खांबावर दुरूस्तीसाठी चढविले होते. दुरूस्तीचे काम सुरू असताना या खासगी व्यक्तिला विद्युतचा धक्का लागला होता.
*वाशिम तालुक्यातील अनसिंग, खडसिंग, घोटा, जवळा, एकांबा या परिसरात सर्रास खासगी व्यक्तिंमार्फत विद्युत दुरूस्तीची कामे केली जातात. तीन महिन्यापूर्वी एकांबा येथे विद्युत दुरूस्तीचे काम करीत असताना एका खासगी लाईनमनला विद्युतचा धक्का लागल्याने जीव गमवावा लागला होता.
*विद्युत खांब किंवा डीपीमधील बिघाड काढण्यासाठी रिसोड तालुक्यातील ग्रामीण भागात सर्रास खासगी व्यक्तिंनाच खांबावर चढविले जाते. अधिकृत लाईनमन खाली आणि खासगी व्यक्ति विद्युत खांबावर असे चित्र आहे. सवड, मोप, व्याड, रिठद या परिसरात हा प्रकार सर्वात जास्त आहे. यामध्ये काही अनर्थही घडू शकतो.