वाशिम : जिल्ह्यातील तीन मतदारसंघांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीने व्यावसायिक दृष्टिकोनातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रचार साहित्य, वाहनांचा ताफा, खानावळी, पेट्रोल-डिझेल, फ्लेक्स, बॅनर, हॉटेल, पानट पर्या आदी छोट्या-मोठय़ा व्यावसायिकांसाठी विधानसभा निवडणूक म्हणून दिवाळीपूर्वीची दिवाळी ठरली. छोट्या-मोठय़ा व्यवसायातून किमान दोन ते तीन कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विधानसभा निवडणुकीत लखपती व करोडपती उमेदवारांनी रिंगणात उडी घेतली होती. जिल्ह्यात एकूण ५७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. प्रमुख उमेदवारांचा अधिकृत वाहनांचा ताफा, प्रचार साहित्य, खानावळी, फ्लेक्स, बॅनरची गरज अनेक छोट्या-मोठय़ा व्यावसायिकांना रोजगार देऊन गेली. दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणुकीचा बार उडाल्याने छोट्या व्यावसायिकांसह काही चाणाक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची दिवाळी पूर्वीच दिवाळी साजरी झाली. निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या भाऊगर्दीने लढती बेरंग झाल्या होत्या. मातब्बरांच्या दृष्टीने त्या डोकेदुखीच्या ठरल्या खर्या; या लढतीतील उलाढालीने जिल्ह्यातील छोट्या व्यवसायिकांसह व्यापारी व उद्योगक्षेत्र सुखावले. शहरी व ग्रामीण भाग अक्षरश: निवडणूकमय झाला होता. गावा-गावांमधून पदयात्रा, मिरवणुका तसेच सभा, संमेलनाच्या निमित्ताने का असेना दवंडी वाजविणार्यांपासून बॅण्डवाले, तडमताशावाले किंवा डीजे चालकांना सुद्धा सुगीचे दिवस आले होते. गावागावांमधील पेंटर, डिजिटल बॅनर्स बनविणार्यांपासून छपाई करणार्या छापखान्यांवाल्यांचाही व्यवसाय वधारला होता. पाठोपाठ शामियाने, मंडप डेकोरेशन, खुच्र्या, टेबल्स, सतरंज्या किंवा अन्य साहित्यवाल्यांना सुगीचे दिवस आले होते. यामधून फुलविक्रेतेही अपवाद राहिले नाहीत. वाहन बाजार तर उलाढालीने अक्षरश: सुखावला होता. वाहन बाजारात गेल्या पंधरा दिवसांपासून एकही वाहन रिकामे उभे नव्हते. डिझेल व पेट्रोलच्या विक्रीतसुद्धा मोठी वाढ झाली असून, त्यामुळे पंपचालकही सुखावले. निवडणूक निमित्ताने किराणा, भुसार बाजारही तेजीत होता. दररोज हजारोंच्या भोजनावळ्या उठत होत्या. त्यामुळे स्वयंपाक्यांसह मजूरांच्या हातालाही काम मिळाले. भांडीकुंडी, पाणी विक्रीचा व्यवसाय, साऊंड सर्व्हिसवाल्यांचाही व्यवसाय वधारला होता. या सर्व व्यवसायातून किमान दोन ते तीन कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे समोर येत आहे.
निवडणूक काळात झाली कोट्यवधींची उलाढाल !
By admin | Updated: October 19, 2014 00:35 IST