स्थानिक जिल्हा कारागृह सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कारागृह अधीक्षक सोमनाथ पाडुळे होते. मंचावर वक्ते म्हणून डॉ. हरीश बाहेती, तरुण क्रांती मंच जिल्हाध्यक्ष नीलेश सोमाणी, डॉ. सुविधा सोमाणी, वरिष्ठ तुरुंगाधिकारी बी.एन. राऊत, मिश्रक रंजित पवार, कॉन्स्टेबल मुरलीधर ठाकरे आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉ. बाहेती व डॉ. सोमाणी यांनी कोरोना लसीचे महत्त्व विशद करुन ही लस सुरक्षित असल्याचे सांगितले. तदनंतर नीलेश सोमाणी यांनी विविध दाखले व उदाहरणांसह कैद्यांचे प्रबोधन केले. कोरोना लस ही पूर्णत: सुरक्षित असून यामुळे आपल्यासह कुटुंबीयांचे रक्षण होत असल्याचे सांगितले. मनातील शंका व गैरसमज याला दूर ठेवून प्रत्येकाने लस घेण्याचे आवाहन केले. त्यावेळी कैद्यांचे मनपरिवर्तन झाले व त्यांनी तत्काळ कोरोना लस घेण्याचे जाहीर केले. तत्काळ जिल्हा कारागृह अधीक्षक पाडुळे यांच्या मार्गदर्शनात संबंधित कैद्यांना कोरोनाची लस देण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने व प्रबोधनाने कारागृहातील कैद्यांचे मनपरिवर्तन होऊन त्यांनी आपले सामाजिक दायित्व व कर्तव्य पार पाडले. प्रशासनापुढे निर्माण झालेली समस्याही यामुळे निराकरण झाली. पाडुळे यांनी सर्व मार्गदर्शक वक्त्यांचे आभार मानले.
जिल्हा कारागृह कैद्यांचे झाले मनपरिवर्तन, घेतली कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:36 IST