वाशिम : स्थगिती मिळविण्यापूर्वी जि.प. व पं.स. पोटनिवडणुकीत केलेली युतीची घोषणा कायम असून, दोन्ही आघाड्या संयुक्तीपणे निवडणुकीला सामोरे जातील, असे वंचित बहुजन आघाडी व जनविकास आघाडीने २१ सप्टेंबर रोजी वाशिम येथे पार पडलेल्या आढावा सभेत जाहिर केले. दुसरीकडे महाविकास आघाडीचे भिजत घोंगडे कायम असल्याने इच्छूक उमेदवारही संभ्रमात असल्याचे बोलले जात आहे.जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समितीच्या २८ गणांसाठी ५ आॅक्टोबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीचा कार्यक्रम स्थगित होण्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रा. धैर्यवर्धन पुंडकर आणि जनविकास आघाडीचे नेते अॅड. नकूल देशमुख यांनी युतीची घोषणा केली होती. त्यानंतर पोटनिवडणुकीला स्थगिती मिळाल्याने राजकीय घडामोडीदेखील स्थिरावल्या. दरम्यान, स्थगिती उठविण्यात आल्याने निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असून, जनविकास व वंचित आघाडीची युती कायम असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष रवीन्द्र देशमुख व जनविकास आघाडीचे नेते अॅड. नकूल देशमुख, गजाननराव लाटे यांनी २१ सप्टेंबर रोजी जाहिर केले. या आढावा बैठकीत पुढील रणनितीवर चर्चा झाली असून, निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाण्यावर शिक्कामोर्तब झाले. दुसरीकडे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे अद्याप काही निश्चित नसून, चर्चेचे गुºहाळ सुरू आहे. महाविकास आघाडी होणार की नाही, याकडे इच्छूक उमेदवारांचे लक्ष लागून आहे.
जि. प. पोटनिवडणूक; जनविकास, वंचित आघाडीच्या युतीची पुनर्घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 18:23 IST