रिसोड : आर्थिक स्तर उंचावण्यासाठी राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्यात याव्यात, या मागणीकरिता तालुका धनगर समाज आरक्षण हक्क कृती समिती आणि समाज बांधवांचा मोर्चा ३१ जुलै रोजी तहसील कार्यालयावर धडकला. या मोर्चात धनगर समाज बांधवांसह महिला व युवक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा आसनगल्ली, शिवाजी चौक, गुजरी चौक, आंबेडकर चौक, सिव्हिल लाईन, पोस्ट ऑफिस चौक मार्गे तहसील कार्यालयात काढण्यात आला. या मोर्चात धनगर समाजाचे शेकडो युवक, पुरुष, महिला सहभागी होत्या. आघाडी शासनाविरोधात विविध प्रकारच्या घोषणाबाजी करुन मोर्चेकर्यांनी संपूर्ण शहर दणाणून सोडले होते. साडेबाराच्या दरम्यान मोर्चा तहसील कार्यालयावर धडकताच मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर करण्यात आले. यावेळी आरक्षण हक्क कृती समितीच्या बहुतांश पदाधिकार्यांनी आघाडी शासनाचा निषेध करीत मोर्चाला मार्गदर्शन केले. तद्वतच तहसीलदार अमोल कुंभार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. भारतीय राज्यघटनेने सर्वांना जगण्याचा व प्रगती करण्याचा समान अधिकार बहाल केला आहे; परंतु शासनाच्या एका चुकीमुळे कोट्यवधी धनगर समाज बांधवांना त्यांच्या हक्कापासून शासन वंचित ठेवत आहे, असा आरोप निवेदनातून करण्यात आला. निवेदनावर धनगर समाज आरक्षण कृती समितीचे पदाधिकारी गजानन दहातोंडे, रवींद्र कष्टे, रामेश्वर काळे, गजानन बाजड, ज्ञानेश्वर खोरणे, गजानन कातडे, राहुल हुले, गजानन बोरकर, रामदास फुके, तुकाराम फुके आदी पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
रिसोड तहसीलवर धनगर समाजाचा मोर्चा
By admin | Updated: August 1, 2014 02:19 IST