कामरगावात बसस्थानक ते लाडेगाव ॲटो पाॅईंट हा वर्दळीचा व महत्त्वाचा रस्ता असून सन २००९-१० मध्ये आ. राजेंद्र पाटणी यांच्या निधीतून या रस्त्याचे सा. बां विभागाच्या वतीने काम करण्यात आले होते. तेव्हापासून तर आतापर्यंत जवळपास १२ वर्ष या रस्त्याची डागडुजी करण्यात न आल्याने या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले व रस्त्यातील लोखंडी सळा बाहेर आल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. सन २०१७ मध्ये आ. पाटणींनी पुन्हा या रस्त्यासाठी २० लाखाचावर निधी उपलब्ध करून दिला. परंतु संबंधित विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे जवळपास चार वर्ष या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही. अखेर १५ जून रोजी सा. बां. विभागाला या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यास मुहूर्त गवसला आणि कामास प्रारंभ झाला. उद्घाटनावेळी रस्त्याच्या कामात टाकण्यात आलेल्या लोखंडी सळीच्या चटईत दोन लोखंडी सळीमधील अंतर एक फूट होते परंतु उद्घाटन संपले आणि दोन सळीतील अंतर दोन फूट करण्यात आले. एवढेच नव्हे तर बारा वर्षांनंतर झालेल्या या रस्त्याच्या कामात मातीमिश्रीत डस्ट वापरण्यात आल्याने या रस्त्याच्या भविष्यातील मजबुतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून रस्ता निर्मितीवेळी रस्त्याची उंची कमी करण्यात आल्याचा तसेच रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे व थातूरमातूर करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांतून केला जात आहे. विशेष म्हणजे संबंधित कंत्राटदाराने चार दिवसांत ४०० मीटर रस्त्याचे काम पूर्ण केले असून या चार दिवसांत सदर रस्त्याच्या कामाची पाहणी करण्याकरीता सा. बां. विभागाचा एकही अधिकारी फिरकला नाही. या रस्त्याच्या कामाची चैाकशी करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
रस्ता कामाची पाहणी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:28 IST