अकोला नाक्यावरील पथदिवे बंद
वाशिम : शहरातील मुख्य चौक असलेल्या अकोला नाक्यावरील विद्युत खांबावरील काही पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी या परिसरात सर्वत्र अंधार असतो.
पर्यटनस्थळांच्या विकासाची प्रतीक्षा
वाशिम : मालेगाव तालुक्यातील डव्हा, शिरपूर यासह अन्य पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रांना अद्याप विकासाची प्रतीक्षा लागून आहे. पर्यटनस्थळांचा विकास होण्यासाठी शासनाने भरघोस निधी पुरवावा, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.
छोट्या मालवाहू वाहनांतून जडवाहतूक
वाशिम : छोट्या स्वरूपातील मालवाहू वाहनांच्या टपावर गज, स्प्रिंकलर पाइप, अँगल अशा जड वस्तूंची वाहतूक केली जात आहे. याकडे पोलीस विभागाने लक्ष पुरवून हा प्रकार तात्काळ बंद करावा, अशी मागणी होत आहे.
केनवड परिसरात दवंडीद्वारे जनजागृती
वाशिम : केनवड परिसरातही कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी, याबाबत दवंडी देऊन जनजागृती केली जात आहे. गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले.
कृषी पंप जोडणीची प्रतीक्षाच
वाशिम : कृषी पंप जोडणीसाठी गत वर्षी किन्हीराजा परिसरातील ७० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी महावितरणकडे अर्ज दिले होते. रबी हंगाम संपल्यानंतरही जवळपास ४० शेतकऱ्यांना अद्याप कृषी पंप जोडणी मिळाली नाही.
जऊळका परिसरात सुविधांचा अभाव
वाशिम : जऊळका रेल्वे जिल्हा परिषद गटातील अनेक गावांतील दलित वस्तींमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.