‘पॉस मशीन’चा तुटवडा : कार्यशाळा निरर्थक, प्र्रशासनही झाले हतबलवाशिम : ‘डिजिटल पेमेंट’, ‘आॅनलाईन’ व्यवहारांना चालना देत संपूर्ण जिल्हा ‘कॅशलेस’ करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला. त्या दिशेने नोटबंदीच्या काळात प्रयत्नही झाले. मात्र, प्रशासनाचा हा निर्धार पूर्णत: तकलादू ठरला असून हजारोंच्या संख्येत गरज असताना जिल्ह्याला आतापर्यंत केवळ ३६ ‘पॉस मशिन’ प्राप्त झाल्याने जिल्हा प्रशासनानेही या समस्येपुढे हात टेकले आहेत. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी चलनातून ५०० आणि हजारच्या नोटा रद्द करण्यात आल्या. या नोटबंदीनंतर रोखीच्या व्यवहारांऐवजी आॅनलाईन, डिजीटल पेमेंटचा पर्याय निवडून नागरिकांना ‘कॅशलेस’ व्यवहारांची सवय लावा, असे निर्देश रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. प्रशासनाकडून वेगवेगळ्या स्तरावर प्रशिक्षणही देण्यात आले. मात्र, जानेवारी २०१७ पासून कॅशलेसंदर्भातील जनजागृती मोहीम पूर्णत: थंडावली असून रोखीच्याच व्यवहारांना प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये नेमक्या किती ‘पॉस मशीन’ची गरज आहे, त्याची माहीती घेण्यात येईल. सर्व बँकांच्या प्रमुखांना पुरेशा मशीन उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा केला जाईल. ग्रामीण व शहरी भागात मुख्य व्यापारपेठेतील मोठ्या दुकानांसमोर दर्शनी भागात कॅशलेस व्यवहारांसंदर्भात जनजागृतीपर फलक लावण्यात येतील. मात्र, नागरिकांनी देखील प्रशासनाकडून हाती घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. - व्ही.एच.नगराळे, व्यवस्थापक, अग्रणी बँक, वाशिम
‘कॅशलेस’ व्यवहारांचा निर्धार ठरला तकलादू!
By admin | Updated: April 6, 2017 00:43 IST