देपूळ परिसरात स्वच्छता अभियान थंडावले
देपूळ : परिसरातील अनेक गावांमध्ये संपूर्ण स्वच्छता अभियान पूर्णत: थंडावले असून निर्मल ग्राम योजना तथा संत गाडगेबाबा संपूर्ण स्वच्छता अभियान कागदोपत्रीच राबविल्या जात असल्याचे दिसून येत आहे.
................
शेकडो कृषी पंप जोडण्या प्रलंबित
वाशिम : कोटेशनचा भरणा करूनही अद्यापपर्यंत शेकडो कृषी पंप जोडण्या प्रलंबित आहेत. ही समस्या विनाविलंब निकाली काढून शेतक-यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी मनसेचे मनीष डांगे यांनी महावितरणकडे सोमवारी निवेदनाव्दारे केली.
....................
अतिक्रमणांच्या सर्वेक्षणाकडे दुर्लक्ष
मंगरूळपीर : तालुक्यातील ग्रामीण भागात गायरान जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. जिल्हाधिका-यांनी याकडे लक्ष पुरवून संबंधित यंत्रणेला सर्वेक्षणाचे आदेश द्यावे व अतिक्रमण हटविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी दशरथ पवार यांनी सोमवारी निवेदनाव्दारे केली आहे.
..................
बसस्थानकात सुविधांचा अभाव
मालेगाव : येथील नवीन बसस्थानक कार्यान्वित होऊन पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला; मात्र भौतिक सुविधा अद्याप मिळालेल्या नाहीत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
.....................
तलावासाठी मिळाले केवळ आश्वासन
राजुरा : गाव परिसरातील नदी नाल्यावर सिंचन तलाव, पाझर तलाव, गाव तलाव उभारण्यासंबंधी गेल्या १५ वर्षांपासून प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्वासनेच मिळाली आहेत. कामे न झाल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
.......................
कर्ज देण्यास बँकांची टाळाटाळ
अनसिंग : ग्रामीण स्वयंरोजगार योजनेअंतर्गत कर्ज देण्यास बँकांकडून टाळाटाळ केली जात आहे. याकडे जिल्हा अग्रणी बँकेने लक्ष देण्याची मागणी अतुल ताठे यांनी ११ जानेवारीला निवेदनाव्दारे केली.
.....................
क्षयरुग्णांनी वेळोळी तपासणी करण्याचे आवाहन
वाशिम : जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी राबविलेल्या मोहिमेत १०९७ क्षयरुग्ण आढळले होते. संबंधित रुग्णांनी नियमित उपचार करून घ्यावे, त्यात कुठलीही हयगय करू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
..................
पूल निर्मितीकडे लक्ष देण्याची मागणी
शिरपूर जैन : लघुपाटबंधारे विभागाकडून बोरखेडी सिंचन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली; मात्र शेताकडे जाणा-या रस्त्यावर पुलाची निर्मिती झाली नसल्याने पावसाळ्यात गैरसोय होते. याकडे लक्ष देण्याची मागणी शेतक-यांमधून होत आहे.
...................
प्लास्टिक पिशवी वापरणा-यांवर कारवाई
मालेगाव : शहरात प्लास्टिक पिशवी वापरणा-यांवर कारवाई केली जात आहे. यामाध्यमातून नगर पंचायत दंड वसूल करीत असल्याचे दिसून येत आहे.
.....................
मानोरा येथे वाहतूक विस्कळीत
मानोरा : येथील शिवाजी चौकात वाहतूक विस्कळीत होणे ही बाब नित्याचीच झाली आहे. पोलीस कर्मचा-याची नियुक्ती करावी, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली; मात्र त्याकडे कुणीही लक्ष दिलेले नाही. ..................
बालकांची आधार नोंदणी रखडली
तोंडगाव : तोंडगाव परिसरातील काही गावांमध्ये आधार नोंदणी केंद्राचा अभाव आहे. यामुळे शून्य ते ६ वर्षे वयोगटातील अनेक बालकांची आधार नोंदणी रखडली आहे. जिल्हा परिषद गटात पुरेसे आधार नोंदणी केंद्र देण्यात यावे, अशी मागणी पालकांनी सोमवारी केली.
.......................
बाजारपेठेत गर्दी; नागरिक बेफिकीर
शिरपूर जैन : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी करू नये, असे आवाहन वारंवार केले जात आहे. असे असताना नागरिक बेफिकीर असून बाजारपेठेत सोमवारी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले.