मानोरा (जि. वाशिम): तालुक्यातील गव्हा येथे १३ डिसेंबर रोजी तीन ते चार महिन्यांचे कन्या अर्भक मृतावस् थेत आढळून आले. याप्रकरणी पोलीस पाटील दिलीप वसंतराव देशमुख यांच्या तक्रारीवरून मानोरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस पाटील दिलीप वसंतराव देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले आहे की, गव्हा येथील आसोला मार्गावर असलेल्या पुलानजीक १३ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास तीन ते चार महिन्यांचे कन्या अर्भक मृतावस्थेत पडून असल्याचे लोकांना दिसले. परिसरात ही बातमी वार्यासारखी पसरून खळबळ उडाली. पोलीस पाटील दिलीप देशमुख यांनी या संदर्भात पोलिसांना कळविताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत अर्भक तपासणीसाठी मानोरा ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध मानोरा पोलिसांनी कलम ३१२, ३१८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर अर्भक स्त्री जातीचे असून, मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, सदर अर्भक कन्या असल्यामुळे बेकायदेशीररीत्या गर्भचाचणी करून त्याची हत्या करण्यात आली असावी आणि सदर अर्भकाच्या मातेनेच हे अर्भक फेकून पळ काढला, असावा, अशी शंका ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
गव्हा येथे आढळले मृत अर्भक
By admin | Updated: December 14, 2015 02:27 IST