कारंजा: उच्च रक्तदाबाने अंजनगाव सुर्जी येथील २३ वर्षीय गर्भवती महिलेचा येथील विठ्ठल हॉस्पिटलमध्ये शनिवार २ मे रोजी मृत्यू झाला. त्यामुळे काही वेळ हॉस्पिटल परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. कारंजा येथील काजीपुरा भागातील माजी नगरसेवक नसरुल्लाखा यांची गर्भवती मुलगी अमरीन कौसर मो. शारीक ही स् थानिक नवीन बसस्थानकाजवळच्या विठ्ठल हॉस्पिटलमधील डॉ. रश्मी गुंजाटे यांच्याकडे उपचार घेत होती. शुक्रवार १ मे रोजी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास गर्भवती महिलेला तिच्या नातेवाइकांनी बाळंतपणासाठी विठ्ठल हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. गर्भवती महिलेच्या सांगण्यावरून डॉक्टरांनी नैसर्गिक बाळंतपण होण्यासाठी प्रयत्न केले; पण शनिवार २ मे च्या सकाळी महिलेचा रक्तदाब मोठय़ा प्रमाणात वाढला. यावेळी डॉ. गुंजाटे यांनी भूलतज्ज्ञ डॉ. सुरेश भोडणे, डॉ. अजय कांत, डॉ. शार्दूल डोणगावकर, डॉ. यशवंत टेकाडे यांना हॉस्पिटलला बोलावले. सर्व तज्ज्ञ विठ्ठल हॉस्पिटलला पोहोचले; मात्न गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यापूर्वीच सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. दरम्यान, ही बातमी वार्यासारखी पसरल्याने हॉस्पिटल परिसरात शेकडो नागरिकांची गर्दी झाली. प्रसंगावधान पाहून डॉ. राम गुंजाटे यांनी पोलिसांना कळविले. पोलीसही तातडीने हॉस्पिटलजवळ पोहोचले. डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी गर्भवती महिलेच्या नातेवाइकांची समजूत काढली.
उच्च रक्तदाबाने गर्भवती महिलेचा मृत्यू
By admin | Updated: May 3, 2015 02:16 IST