मेडशी (जि. वाशिम) : धावत्या डीझल व पेट्रोल टँकरच्या कॅबिनने अचानक पेट घेतल्याची घटना अकोला-वाशिम महामार्गावरील तलाववाडी फाट्याजवळ शुक्रवारी सायंकाळी ४.३0 वाजतादरम्यान घडली. आग वेळीच आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. व्यंकटेश पेट्रोलपंप मालेगाव यांचा टँकर क्रमांक एमएच ३७ - ५0५१ हा डीझल व पेट्रोल घेऊन गायगाव डेपोवरून मालेगावला येत असताना, अकोला ते वाशिम महामार्गावर मेडशीनजीक तलाववाडीजवळ कॅबिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन टँकरने पेट घेतला. टँकरला आग लागल्याचे दिसून येताच, एका ठिकाणी टँकर उभा करण्यात आला. टँकरमध्ये पेट्रोल व डीझल असल्याने स्फोट होण्याच्या भीतीपोटी दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प होती. पातूरवरून व वाशिम अग्निशामक दलाच्या गाडीने आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले. या टँकरमध्ये ४५00 लिटर पेट्रोल व १३000 लिटर डीझल होते. पेट्रोलच्या टँकरने पेट घेतल्याचे चित्र बघता दूरवरच अन्य वाहने थांबली होती. एका तासात पोलिसांच्या सहकार्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली. शिवसेनेचे ज्ञानेश्वर मुंढे, ग्रा.पं.सदस्य शेख जमीर, प्रसाद पाठक यांनी पाण्याचे टँकर आणून आग विझविण्याकरिता मदत केली. सहायक पीआय कांबळे, पोलीस उपनिरीक्षक धोत्रे, पो.काँ. शाहीदशाह जमादार जाधव, गायकवाड घटनास्थळी उपस्थित होते.
मेडशीजवळ धावत्या डीझल टँकरने घेतला पेट!
By admin | Updated: May 28, 2016 01:29 IST