मानोरा : घरगुती गॅस सिलिंडरचा अवैधरित्या साठा करून त्याची काळ्या बाजारात जादा दराने विक्री केली जात आहे. तसेच गॅसकिटवर चालणार्या वाहनांना रिफिलिंग करून देण्याचा व्यवसायही तेजीत आला आहे. ग्रामीण भागातील सिलिंडरधारकांचे कार्ड गोळा करून मिळणार्या सिलिंडरची उचल केली जात आहे. याशिवाय एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तीच्या नावाने स्वतंत्र रेशनकार्ड तयार करण्यात आले आहे. अनेकांनी वेगवेगळ्या नावाने गॅसचे कार्ड गोळा केले आहे. वर्षभरात १२ सिलिंडर एका कार्डावर दिले जातात. नेमक्या याच बाबीचा फायदा घेऊन गॅसकीटवर चालणार्या वाहनात सिलिंडरमधील गॅस रिफिलिंग करून दिले जाते. यासाठी ६00 ते ७00 रूपये आकारले जातात. सिलिंडर असले तरी कार्ड नसल्याने अनेक ग्राहकांना अव्वाच्या सव्वा दरात गॅस सिलिंडर घ्यावे लागते. मानोरा शहरात गॅस एजन्सी नसल्याने ग्राहकांना दिग्रस, मंगरूळपीर, दारव्हा, कारंजा येथून गॅस आणावे लागते. एजन्सीने त्यांना घरपोच गॅस द्यावयास पाहिजे पण तसे न होता काही दलाल हे काम करीत आहे. बहुतांश ठिकाणी भरलेले सिलिंडर तत्काळ मिळते. मात्र येथे मात्र टंचाई भासविली जाते. काळ्या बाजारात मात्र गॅस नियमित उपलब्ध असते. अवैधरित्या साठा करून हजारोची कमाई एजन्सीला हाताशी धरून काही लोक करीत आहे. आरटीओ विभागाकडूनही गॅस सिलिंडरवर चालणार्या वाहनाची तपासणी केली जात नाही. अनधिकृतरित्या गॅस कीट लावली असलेली वाहने अनेक आहेत. त्यात घरगुती वापराच्या सिलिंडरमधील गॅस रिफिलिंग करून वापरला जातो ही बाब दुर्लक्षित केली जात आहे.