बँकांसमोर ग्राहकांची गर्दी कायम
रिसोड शहरातील चित्र : फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
रिसोड : कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी बँकेत, तसेच बँकांसमोर गर्दी करू नये असे आवाहन तालुका व जिल्हा प्रशासनातर्फे यापूर्वी केले होते. अलीकडच्या काळात कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने नागरिक बिनधास्त झाले असून, राष्ट्रीयकृतसह सहकारी बँकांमध्ये गर्दी होत असल्याचे बुधवारी दिसून आले.
रिसोड शहरात जून महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. जुलै ते सप्टेंबर या महिन्यात शहरात कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्यानंतर, कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहेत. जानेवारी महिन्यात शहरासह तालुक्यात कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने, नागरिकांसह प्रशासनही बिनधास्त असल्याचे दिसून येते. कोरोनाचा आलेख खाली येत असला, तरी धोका अजून टळला नाही. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आदींचे पालन सर्वांनी करणे गरजेचे आहे. मात्र, बँकांमध्ये या नियमाचे पालन होत नसल्याचे दिसून येते. शहरातील विविध बँकांमध्ये नागरिकांची गर्दी होत असून, फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.