वाशिम : जिल्हा परिषदेंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक म्हणून नियुक्त केलेल्या जवळपास सात ते आठ उमेदवारांना १० हजाराच्या अनामत रक्कम प्रतीक्षा कायम आहे. यापैकी दोन उमेदवारांच्या अनामत रक्कम परत करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक म्हणून नियुक्त केलेल्या उमेदवारांकडून प्रत्येकी १० हजार रुपये अनामत रक्कम जमा करून घेण्यात येते. तीन वर्षांनंतर या उमेदवारांना नियमित सेवेत समाविष्ट केल्यानंतर जमा केलेली रक्कम त्यांना परत करावयाची असते. जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती असून, ग्रामसेवकांची ३०३ पदे मंजूर आहेत. गत तीन वर्षांपासून ग्रामसेवकांची पदभरती बंद असल्याने सध्या जिल्ह्यात दोन कंत्राटी ग्रामसेवक आहेत तर यापूर्वीच्या कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्यात आले. यापैकी जवळपास आठ कर्मचाऱ्यांना अनामत रकमेची प्रतीक्षा आहे.
००
ग्रामसेवक संघटनेचा पाठपुरावा
कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी संघटनेतर्फे पाठपुरावा करण्यात येतो. गत पाच वर्षांत १५ ते २० कंत्राटी ग्रामसेवक नियमित सेवेत समाविष्ट झाले असून काहींची अनामत रक्कम परत करण्यात आली तर काही ग्रामसेवकांची अनामत रक्कम परत होणे अद्याप बाकी आहे. या ग्रामसेवकांना तातडीने अनामत रक्कम परत करण्यात यावी, यासंदर्भात पंचायत विभागाकडे ग्रामसेवक संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे, असे जिल्हाध्यक्ष आत्माराम नवघरे, जिल्हा सचिव अरुण इंगळे यांनी सांगितले.
०००
ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांसाठी ग्रामसेवक संघटना शासन, प्रशासन दरबारी पाठपुरावा करते. कंत्राटी ग्रामसेवकांना तीन वर्षांचा करार संपल्यानंतर शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घेणे, अनामत रक्कम परत करणे याबाबत जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा सुरू आहे.
- अरुण इंगळे
जिल्हा सचिव, ग्रामसेवक संघटना
००
तीन वर्षांचा करार संपल्यानंतर कंत्राटी ग्रामसेवकांना तातडीने कायमस्वरूपी म्हणून सेवेत सामावून घेण्यात आले. जिल्ह्यात सध्या दोन कंत्राटी ग्रामसेवक आहेत. पंचायत समित्यांकडून प्राप्त प्रस्तावानुसार कंत्राटी ग्रामसेवकांना अनामत रक्कम परत केली जाते.
- डाॅ. विनोद वानखडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.
००
जिल्ह्यात एकूण ग्रामसेवक ३०३
००
कंत्राटी ग्रामसेवक २