वाशिम : गत १५ वर्षापासून जिल्ह्यात सत्तेची फळे चाखणार्या कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसला यंदाच्या विधानसभा निवडणूकीत मतदारांनी सपसेल नाकारले. या दोन्ही पक्षांच्या काही उमेदवारांना तर चक्क अनामत रक्कमही वाचविता आली नाही, ही वस्तुस्थिती आहे. वास्तविक या पक्षांचा पराभव हा मतदारांनी अथवा विरोधकांनी नव्हे तर स्वकियांनीच केला असे म्हटल्यास अतिश्योक्ती ठरणार नाही. या निवडणूकीला अस्तित्वाची लढाई म्हणून शिवसेना, भाजप व मनसेवाले लढत असताना, कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसमधील काहींनी स्वत:च्या उमेदवारांच्या विरोधातच शड्ड ठोकले. परिणामी, मतदार गोंधळला. यातूनच या दोन्ही पक्षाला मानहानी जनक पराभवाला समोरा जावे लागले.शिवसेना व भाजपच्या युतीचा घटस्फोट तथा कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या आघाडीतील बिघाडीमुळे यंदाची विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. कॉग्रेस व राष्ट्रवादीचा अपवाद वगळता इतर सर्वच पक्षांनी या निवडणूकीत स्वत:ची प्रतिष्ठा झोकली होती. मात्र कॉग्रेस व राष्ट्रवादीचे नेते आपसातील वैर काढण्यातच मश्गुल दिसले. स्वबळावर लढणार्या दोन्ही कॉग्रेसला जिल्ह्यात अस्तित्व दाखविण्यासाठी या निवडणूकीच्या माध्यमातून चांगली संधी चालून आली होती. राज्यात भाजपची लाट असली तरी, जिल्ह्यातील परिस्थिती या उलट होती. वाशिम मतदारसंघातील विद्यमान आमदारांवर मतदार नाराज होते. कारंजा मतदारसंघातील भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षाचे उमेदवार पार्सल होते. त्यामुळे कॉग्रेसने या मुद्द्यांना कॅश केले असते, परिस्थिती बदलण्याची शक्यताही नाकारता आली नसती, मात्र, कॉग्रेस व राष्ट्रवादीवाल्यांनी विरोधकांपेक्षा स्वत:चीच जीरवण्यावर भर दिला.
कॉग्रेस, राष्ट्रवादीला आत्मचिंतनाची गरज!
By admin | Updated: October 22, 2014 00:28 IST