२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १२ लाखांच्या आसपास आहे. त्यात १८ ते ४४ वर्षे, ४५ वर्षांपेक्षा अधिक आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या विचारात घेता किमान ८ ते ९ लाख लोकांना लसीचा पहिला व दुसरा डोस द्यावा लागणार आहे ; मात्र आतापर्यंत पहिला व दुसरा डोस मिळून केवळ २ लाख २७ हजार ४१७ जणांचे लसीकरण झाले आहे. पहिला डोस घेणाऱ्या सुमारे ४३ हजार ज्येष्ठ नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ७४ हजार १३३ नागरिकांना पहिला डोस मिळाला ; मात्र त्यातील ५९ हजार नागरिकांना दुसरा डोस मिळण्याची प्रतीक्षा आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील केवळ ७ हजार ३२० नागरिकांना पहिला डोस देऊन लसीकरण बंद करण्यात आले. संबंधिताना दुसरा डोस कधी मिळणार आणि या वयोगटातील उर्वरित लाखो लोकांच्या लसीकरणास कधी सुरूवात होणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तथापि, कोरोना लसीकरणाच्या अत्यंत संथ असलेल्या या गतीवरून डिसेंबर २०२१ अखेरच काय ; पण २०२२ अखेर ही सर्वांना लस मिळाली तरी मिळविले, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
.....................
१६ जानेवारी २०२१ पासून लसीकरणास सुरूवात
.............
जानेवारी -
प्रत्येक दिवशी - ६००
प्रत्येक आठवड्याला - ४,०००
प्रत्येक महिन्यात - १५,०००
...................................
फेब्रुवारी-
प्रत्येक दिवशी - ८००
प्रत्येक आठवड्याला - ५,५००
प्रत्येक महिन्यात - १५,०००
..........
मार्च -
प्रत्येक दिवशी - १,०००
प्रत्येक आठवड्याला - ७,०००
प्रत्येक महिन्यात - २५,०००
..............
एप्रिल -
प्रत्येक दिवशी - २,५००
प्रत्येक आठवड्याला - १७,०००
प्रत्येक महिन्यात - ७०,०००
..................
मे -
प्रत्येक दिवशी - ३,०००
प्रत्येक आठवड्याला - २०,०००
प्रत्येक महिन्यात १,००,०००
...............
जिल्ह्यात १३७ केंद्र, ८६ सुरू
जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी एकूण १३७ केंद्र सुरू करण्यात आले आहेत. त्यातील ८६ केंद्र सध्या कार्यान्वित असून २ लाख २७ हजार ४१७ जणांना लस देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना सध्या कोरोना लसीचा दुसरा डोस दिला जात आहे.
.............
१८ पेक्षा कमी वयाचे काय?
जिल्ह्यात १ मे पासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरूवात करण्यात आली होती ; मात्र तुटवडा उद्भवून दुसऱ्या डोस करिता पात्र व्यक्तींना लस मिळणार नसल्याची शक्यता गृहीत धरून ६ मे पासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबविण्यात आले.
जिल्ह्यातील अनेकांना अद्यापपर्यंत लसीचा दुसरा डोस मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर १८ पेक्षा कमी वय असलेल्या मुलांचा लसीकरणासाठी कुठलाच विचार झालेला नाही. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग जडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना त्यांचेही लसीकरण होणे अत्यावश्यक ठरत आहे.
.....................
कोट :
जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना लसीकरण प्रक्रिया राबविण्यास सुरूवात करण्यात आली. त्या अनुषंगाने जिल्हाभरात १३७ लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. शासनाकडून लसींचा साठा प्राप्त होतो, त्याप्रमाणे लसीकरण केले जात असून सध्या कोविशिल्डचे १७,००० आणि कोव्हॅक्सिनचे ३,६०० डोस उपलब्ध आहेत.
- डाॅ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम