वाशिम : 'आमचं गाव- आमचा विकास' या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात १ जुलै रोजी करावयाच्या वृक्षारोपण मोहिमेचा आढावा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गणेश पाटील यांनी शुक्रवारी घेतला. सर्व गटविकास अधिकारी आणि विभागप्रमुखांना वृक्ष लागवडीबाबत दक्षता बाळगण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या. १ जुलै रोजी संपूर्ण राज्यात दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेंतर्गत येणार्या विभागाने ८४ हजार वृक्ष लागवड करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचा शाळा परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र, पशू वैद्यकीय दवाखाने, ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी जागा आदी ठिकाणी वृक्षारोपण करावयाचे आहे. या दृष्टिकोनातून मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी गटविकास अधिकारी व विभागप्रमुखांची बैठक घेऊन वृक्षारोपण मोहिमेचा आढावा घेतला. ८४ हजार खड्डय़ांपैकी आतापर्यंंत ४0 हजार खड्डे पूर्ण झाल्याचा अहवाल विभागप्रमुख व गटविकास अधिकार्यांनी दिला. सध्या शाळा बंद असल्याने २0 जूनपासून वृक्षारोपणाची पूर्वतयारी करण्याच्या सूचना पाटील यांनी शिक्षणाधिकार्यांना दिल्या. पहिला दमदार पाऊस झाल्यानंतर वृक्षारोपण मोहिमेला प्रारंभ केला जाणार आहे. वृक्षारोपणासाठी पूर्वतयारी म्हणून खड्डे तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जि.प. शाळा परिसरात वृक्षारोपण करण्याच्या मोहिमेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी केंद्र प्रमुखाकडे सोपविली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर वृक्षारोपण करण्याचे निर्देश गणेश पाटील यांनी दिले. वृक्षारोपण मोहिमेत दिरंगाई खपवून घेणार नसल्याचा इशारा पाटील यांनी दिला. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, पंचायत विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. देवीदास हिवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे, महेश पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास पेंदोर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर.ए. कल्यापुरे यांच्यासह विभागप्रमुखांची उपस्थिती होती.
‘सीईओं’नी घेतला वृक्षारोपणाचा आढावा
By admin | Updated: June 11, 2016 03:01 IST