-----------
‘रोहयो’च्या कामांचे नियोजन
वाशिम : जिल्ह्यात तीन लाखांहून अधिक जॉबकार्डधारक मजूर आहेत. या कामगारांसाठी रोहयोची कामे सुरू करण्याची तयारी रोहयो विभागाने केली आहे. यासाठी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून कामाचे नियोजन व मागणी नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.
---------
रोहींकडून सोयाबीनचे नुकसान
वाशिम : खरीप हंगामातील सोयाबीन पीक चांगलेच बहरले आहे; परंतु आता वन्यप्राणी या पिकांवर ताव मारत आहेत. यात रोहींचे कळप शेकडो एकर क्षेत्रातील शिवारात धुडगूस घालून सोयाबीन, मूग, उडीद ही पिके फस्त करीत असल्याचे चित्र पाहायला मिळते.
------------------
झुकलेल्या खांबामुळे अपघाताची भीती
वाशिम : तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी वीजजोडणीसाठी उभारलेले वीजखांब पाऊस आणि वादळवाऱ्यामुळे झुकले आहेत. एखादवेळी खांब कोसळल्यास अपघाताची भीती असल्याने हे खांब सरळ करण्याची मागणी होत आहे.
-------
लाईनमनची पदे रिक्त
वाशिम : मेडशी महावितरण कार्यालयात लाईनमनची तीन पदे रिक्त आहेत. या केंद्रांतर्गत घरगुती आणि शेतकरी मिळून १३०० ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी एकच लाईनमन आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास शेतकऱ्यांसह घरगुती वीजग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
--------------
पाणंद रस्ते झाले दलदल
वाशिम : मानोरा तालुक्यातील इंझोरी शिवारात पाणंद रस्त्यांच्या कामाला सहा महिन्यांपूर्वीच मंजुरी मिळाली; परंतु अपुऱ्या निधीमुळे या रस्त्यांची कामे सुरू होऊ शकली नाहीत. आता हे रस्ते पावसामुळे दलदलसदृश झाल्याने शेतकऱ्यांची वहिवाट बंद पडली आहे.
--------------
बीएसएनएलची कनेक्टिव्हिटी खंडित
वाशिम : गत काही दिवसांपासून भारत संचार निगम लिमिटेडच्या इंटरनेटची कनेक्टिव्हिटी वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे आपले सरकार केंद्रांतील कामे खोळंबून ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
-------
इंझोरीतील पथदिवे बंद
वाशिम : निम्मा पावसाळा उलटला तरी ग्रामीण भागांतील इंझोरी येथील अनेक पथदिवे बंद असून, हे पथदिवे सुरू करण्याबाबत ग्रामपंचायत उदासीन आहे. पथदिवे बंद असल्याने ग्रामस्थांना रात्री अडचणींचा सामना करावा लागत आहे.
------------------