योगेश यादव / कारंजालाडउच्च न्यायालयाच्या मज्जावानंतरही शहराच्या विविध ठिकाणी विनापरवानगीने लावण्यात येणारे फलक, बॅनर्स, पोस्टर्स विरोधात स्थानिक नगर परिषद प्रशासनाने ३ सप्टेंबरपासून धाडसी मोहीम उघडली असून, शहराचे विद्रुपीकरण करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे. येथील नगर परिषदेच्या हद्दीत राजकीय पक्ष, संघटना तथा आस्थापनेचे छोट्या मोठय़ा आकाराचे विविध बॅनर्स विनापरवानगीने लावण्यात आले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत आहे. याशिवाय रस्त्याने ये-जा करणार्या वाहनधारकांचे लक्ष या बॅनर्सकडे आकर्षित होत असल्याने तथा रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या बॅनर्समुळे समोरासमोरील वाहनधारकास वाहन दिसून येत नसल्याने अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे. शहरातील राणी झाँशी चौक, शिवाजी चौक, जयस्तंभ चौक, महात्मा फुले पुतळा चौक अनधिकृत बॅनर्सचा अड्डा बनले आहे. या बॅनर्समुळे चौक अतिशय बकाल झाले आहे. हे चित्र बदलविण्यासाठी नगर परिषदेने राजकीय पक्ष, संघटना व आस्थापनांना ३ सप्टेंबर रोजी २४ तासाच्या आत अनधिकृत तथा विनापरवानगीने लावण्यात आलेले फलक, बॅनर्स, पोस्टर्स काढून घ्यावे ; अन्यथा नगर परिषद यंत्रणेमार्फत काढून घेण्यात येईल व यापुढे नगर परिषदेकडे रितसर अर्ज करून पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही शासकीय अथवा खाजगी जागेवर बॅनर्स, फलक उभारणी केल्यास महाराष्ट्र मालमत्ता विरूपण प्रतिबंधक अधिनियम १९९५ चे कलम ३ व ४ नुसार कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असा ईशारा दिला आहे. ही मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात आली तर लवकरच शहराचं रूपडं बदललेलं दिसेल, असा आशावाद निर्माण झाला आहे.
अनधिकृत बॅनर्स विरोधात मोहीम
By admin | Updated: September 4, 2014 00:24 IST