रब्बी हंगामातील पिकांची काढणी आटोपल्यानंतर उन्हाचे प्रमाण वाढू लागताच शेतकरी खरीप हंगामाची तयारी सुरू करतात. यासाठी प्राथमिक टप्प्यात शेतातील पिकांचे अवशेष, बांधावरील झुडपे, काडीकचरा गोळा करून ते जाळून नष्ट करण्याचे काम केले जाते. या प्रकारातून शेतीच्या बांधावर असलेल्या वृक्षांचे बुंधे पेटतात आणि मोठमोठे वृक्ष अर्ध्यावर पेटल्याने सुकून पडतात. दरवर्षी या प्रकारातून जिल्ह्यात शेकडो वृक्ष नष्ट होत आहेत. यातून पर्यावरणाची अपरिमित हानी होते. तथापि, पर्यावरण विभाग, वनविभाग किंवा महसूल विभाग यावर नियंत्रण मिळविण्याचा मुळीच प्रयत्न करताना दिसत नाही. यंदाही गेल्या १५ दिवसांपासून शेतकऱ्यांनी शेती मशागतीसाठी काडीकचरा जाळण्याचे काम सुरू केले आहे. यातून अनेक ठिकाणी शेतीच्या बांधावरील मोठमोठे वृक्ष पेटल्याने सुकत असल्याचे चित्र दिसत आहे.
------------
एक प्रौढ वृक्ष शोषतो ४८ पौंड कार्बनडाय ऑक्साईड
हिरव्या वनस्पती आपल्या पानांद्वारे वातावरणातील कार्बनडाय ऑक्साइड वायू शोषून घेतात, तर एक प्रौढ वृक्ष वातावरणातील ४८ पौंड कार्बनडाय ऑक्साईड शोषून दररोज सरासरी २३० लिटर ऑक्सिजन उत्सर्जित करतो. दुसरीकडे एखाद्या व्यक्तीने श्वासोच्छवासाद्वारे फुफ्फुसात घेतलेल्या हवेमध्ये २० टक्के ऑक्सिजन असतो. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी तीन प्रौढ वृक्षांची आवश्यकता असते. त्यामुळे वृक्षांचे संवर्धन करून त्यांची संख्या वाढविणे आवश्यक असताना जिल्ह्यात दरवर्षी मशागतीसाठी पेटविल्या जाणाऱ्या कचऱ्यातून हजारो वृक्ष नष्ट होत आहेत.
---------
सर्वच मुख्य मार्गासह ग्रामीण मार्गावर दिसतो प्रकार
जिल्ह्यातील वाशिम-कारंजा, वाशिम-पुसद, मानोरा-महान, वाशिम-अकोला, रिसोड-वाशिम या मुख्यमार्गासह ग्रामीण भागांतील मार्गांवर हे चित्र पाहायला मिळत आहे. काडीकचरा जाळण्यातून केवळ वृक्षच नष्ट होत नाहीत, तर शेतजमिनीतील सूक्ष्मजीवही नष्ट होत असल्याने जमिनीची सुपीकता घटत आहे. त्यामुळे शेती उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यातही जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर आवश्यक असताना शेतकरी रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर करून त्यात अधिक भर टाकत आहेत.