रिसोड : येथील लोणी रस्त्यावरील अँन्टी करप्शन अँन्ड क्राईम इव्हीस्टीगेशन फ्रन्टच्या नावाखाली कार्यालय उघडून खंडणी वसुलीचा गोरखधंदा सुरू असल्याचा प्रकार रिसोड पोलिसांनी आज केलेल्या कारवाईत उजागर केला. यामध्ये दोन खंडणीबहाद्दरांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना २९ ऑगस्ट रोजी ९ वाजता घडली असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३८४, ४१९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या संदर्भात अधिक माहितीनुसार शहरातून जाणार्या लोणी मार्गावर ऑल इंडिया अँन्टी करप्शन अँन्ड क्राईम इव्हीस्टीगेशन फ्रन्टच्या नावाखाली भ्रष्टाचार निर्मूलन आणि अपराध अनुसंधान फ्रन्टचे कार्यालय उघडण्यात आले होते. ह्यअब होंगा इन्साफह्ण म्हणत सुरू करण्यात आलेल्या या कार्यालयाबाबत तोंडी तक्रारी अनेकांनी पोलिसांकडे दिल्या होत्या. या कार्यालयातील उपाध्यक्षाने खंडणीची मागणी केल्याची तक्रार २९ ऑगस्ट रोजी चहा पावडरचे ठोक विक्रेते मो. मुनवर शेख यांनी ठाणेदार सुरेशकुमार राऊत यांनी दिली. शेख याच्या तक्रारीवरून ठाणेदार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड पोलिसांनी सापळा रचून संबंधित कार्यालयातील राजेश वामनराव लोहटे ऊर्फ राजू पाटील व मो. सरफराज या दोन खंडणीबहाद्दरांना ह्यइन कॅमेराह्ण एक हजार रुपयांची खंडणी घेताना रंगेहात पकडले. पैसे घेतानाच्या व्हिडिओ क्लीप आणखी दोन ते तीन व्यक्तीजवळ आढळल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये बबलू खरात यांच्याकडून दोन हजारांची, तर सुपर प्रोव्हिजनचे संचालक शोएब अली खान यांच्याकडून १५ हजारांची खंडणी घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. रिसोड पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे संबंधित कार्यालयाचा भंडाफोड झाल्याने यापूर्वी घडलेल्या अनेक घटनेमधील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकली जाण्याची दाट शक्यता आहे. या कार्यालयामधील ताब्यात घेतलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले असून, संबंधित कार्यालयामार्फत कुणाकडून खंडणी वसूल करण्यात आली असल्यास त्यांनी रिसोड शहर पोलिस स्टेशनशी तत्काळ संपर्क करावा, असे आवाहन ठाणेदार राऊत यांनी केले आहे.
बोगस भ्रष्टाचार निर्मूलन कार्यालयाचा भंडाफोड
By admin | Updated: August 30, 2014 01:57 IST