वाशिम : राज्यात शिवसेना-भाजप आघाडी २५ वर्षांनंतर, तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस तब्बल १५ वर्षांनंतर प्रथमच स्वतंत्र लढत आहेत. जिल्ह्यातील तीन मतदारसंघात अनेक ठिकाणी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, तसेच कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाचे चिन्ह पंधरा ते पंचवीस वर्षांंच्या कालावधीनंतर मतदारांसमोर नेऊन त्यांना मते मागावी लागत आहेत.राज्यात सन १९९0 मध्ये शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या युतीची मोट बांधल्या गेली होती. मात्र यंदा दोन्ही पक्षातील नेत्यांच्या सत्तेच्या हव्यासापोटी युतीतील २५ वर्षापासूनचा मधुचंद्र संपला आहे. परिणामी, दोन्ही पक्षांनी आपल्या पैलवानांना स्वबळाचे तेल लावून विधानसभा निवडणूकीच्या आखाड्यात उ तरिवले आहे. राज्यात युतीचा जन्म झाला तेव्हापासून वाशिम व रिसोड मतदारसंघात भारतीय जनता पक्षानेच निवडणूक लढली होती तर कारंजा व पुर्नरचनेत बाद झालेल्या मंगरूळपीर मतदारसंघातून शिवसेना लढत आली होती. सन २00८ मध्ये परिसिमन आयोगाने मतदारसंघाची पुर्नरचना केली. त्यामध्ये मंगरूळपीर मतदारसंघ बाद झाला. परिणामी, शिवसेनेच्या वाट्याला जिल्ह्यात केवळ कारंजा हा एकमेव मतदार संघ कायम राहीला. आता युती तुटल्यामुळे कारंजा मतदारसंघात प्रथमच भारतीय जनता पक्ष निवडणूकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांंना घराघरात कमळ फुलविताना कमालीचा त्रास होत आहे. वाशिम व रिसोड मतदारसंघात नेमकी या उलट परिस्थिती आहे. येथे शिवसेना २५ वर्षानंतर प्रथमच लढते आहे. त्यामुळे स्वाभाविकच शिवसैनिकांना येथे प्रचाराला शिवधनुष्य पेलताना घाम फुटुन निघत आहे. सन १९९९ मधील विधानसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाली. जिल्ह्यातील वाशिम व रिसोड व कारंजा मतदारसंघ कॉग्रेसच्या तर मंगरूळपीर हा एकमेव मतदारसंघ त्यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वाट्यावर आला होता. सन २00८ च्या मतदारसंघ पुर्नरचनेत मंगरूळपीर बाद झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेसने लगतचा कारंजा मतदारसंघ आपल्याकडे घेतला. यंदा, मात्र भारतीय जनता पक्ष व शिवसेने प्रमाणेच कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसच्याही आघाडीत बिघाडी झाली. राष्ट्रवादीने कॉग्रेसच्या हातावरील घड्याळ सोडून घेतले. त्यामुळे आता तिन्ही मतदारसंघात दोन्ही कॉग्रेसचे उमेदवार परस् परांच्या समोर उभे ठाकले आहेत.
‘स्वबळाने’ वाढविले ‘ब्लडप्रेशर’
By admin | Updated: October 7, 2014 01:21 IST