शिरपूर जैन : येथील बसस्थानक परिसरात ४ मे रोजी चार जणांना कुत्र्याने चावा घेतला. कुत्रा पिसाळलेला असल्याच्या शंकेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. ४ मे रोजी बसस्थानक व गवळीपुरा परिसरात सकाळी १0 वाजताच्या सुमारास आकाश संजय खिल्लारे रा. वाघी, अरुण उल्हामाले, चंदू परसुवाले व सानियाप परसुवाले या ४ वर्षीय मुलीसह चौघांना अचानकपणे कुत्र्याने चावा घेतला. चावा घेतलेल्या चौघांना शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता येथे वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते. केवळ आरोग्य सहाय्यक गजानन तायडे, कर्मचारी एस.एम. हेवट, महिला कर्मचारी एम.आर. झाटे हे दोघेच जण हजर होते. या तिघांनी कुत्र्याने चावा घेतलेल्या चौघांवर रॅबेजची लस टोचून उपचार केले. कुत्रा पिसाळलेला असल्याची चर्चा गावभर पसरली होती. त्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठय़ा प्रमाणात कर्मचारी संख्या असलेल्या आरोग्य केंद्रातील इतर कर्मचारी सुट्टीचा आनंद उपभोगत असल्याचे दिसून आले. यावेळी एक गर्भवती महिलासुद्धा आरोग्य केंद्रात आली असता तिची तपासणी महिला कर्मचारी झाटे यांनी केली. वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी वर्गाच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी कॉल रिसिव्ह केला नाही.
कुत्र्याने घेतला चार इसमांना चावा !
By admin | Updated: May 5, 2015 00:26 IST