वाशिम : सन २0१३-१४ या सत्रातील खरीप पीककर्जाच्या वसुलीला शासनाने ३१ डिसेंबर २0१४ पर्यंंत स्थगिती दिलेली असतानाही, बँक प्रशासनाने कर्ज वसुलीचा तगादा लावणे सुरू केले आहे. २0१३-१४ या आर्थिक वर्षातील खरीप पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचे निर्देश २0१४ च्या एप्रिल व मे महिन्यात जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी दिले होते; मात्र या निर्देशांना पायदळी तुडवित आणि शासनाच्या आदेशालाही धाब्यावर बसवत बँक प्रशासनाने शेतकर्यांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरूच ठेवले आहेत. आता व्याजासह पीककर्जाचा भरणा करण्याच्या सूचना बँक प्रशासनाने आपल्या खास दूतांमार्फत शेतकर्यांपर्यंत पोहोचविणे सुरू केले आहे. ३0 ऑगस्टच्या आत पीककर्जाचा भरणा करा अन्यथा आणखी जादा टक्क्याने व्याज आकारले जाईल, असा संदेश शेतकर्यांपर्यंंत पोहोचविला जात आहे. एकतर पीककर्जाचे पुनर्गठन झाले नाही. यात भरीस भर म्हणून कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न शेतकर्यांनी उपस्थित केला आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी चिखली येथील विवेक देशमुख, किनखेडा येथील पंजाबराव अवचार, व्याड येथील डॉ. विश्वनाथ गायकवाड यांच्यासह शेतकर्यांनी केली आहे.
कर्ज वसुलीबाबत बँकांचा तगादा
By admin | Updated: August 26, 2014 23:57 IST