वाशिम : जिल्ह्यात ग्रामीण जनतेचा उष्माघातापासून बचाव होण्यासाठी १७ ते २२ एप्रिल या कालावधीत जिल्हा परिषदेतर्फे जनजागृतीपर धडक मोहिम राबविण्यात येत असून २१ एप्रिलपर्यंत ४५६ गावांमध्ये जनजागृती करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.एप्रिल व मे २0१७ या महिन्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता वेधशाळेने दर्शविली आहे. उष्माघातामुळे होणारे मृत्यु टाळण्याकरिता व उष्माघात होवु नये याकरिता काय करावे व काय करु नये याबाबत जनजागृती म्हणून १७ एप्रिलपासून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे धडक मोहिम राबविली जात आहे. प्रत्येक गावामध्ये स्थानिक वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा यांच्यामार्फत स्थानिक नागरिकांचा सहभाग घेवुन आरोग्य शिक्षणाव्दारे जनजागृती करण्यात येत आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर उष्माघात कक्ष स्थापन करुन त्यामध्ये २ बेड, कुलर, पंखा तसेच आवश्यक त्या औषधीसह अद्ययावत ठेवण्यात येत आहे. वैद्यकीय अधिकार्यांनी गावनिहाय क र्मचार्यांच्या चमू तयार करुन प्रत्येक चमूमध्ये स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी यांची समावेश आहे. तसेच आरोग्य सेवक, सेविका, आशा, अंगणवाडी सेविका यांचाही समावेश आहे. गावामधील कुटूंबांना भेट देवून व गावामध्ये सभेचे आयोजन करुन उपस्थित लोकांना आरोग्यविषयक धडे दिले जात आहेत. एकाच दिवशी सकाळी व संध्याकाळी दोन वेगवेगळ्या गावामध्ये सभा घेवून मार्गदर्शन करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी केल्या होत्या. त्याप्रमाणे नियोजन करुन चमू गावातील कुटूंबांना गृहभेटी देत उष्माघाताबाबतचे प्रचार व प्रसिध्दी साहित्य वाचून दाखवित आहेत. २१ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील एकुण ४५६ गावामध्ये ग्रामसभा घेण्यात आल्या. २२ एप्रिल रोजी जनजागृतीपर असलेल्या या मोहिमेचा शेवटचा दिवस आहे. जिल्ह्यातील जनतेने सदर मोहिमेचा लाभ घ्यावा, उष्माघातापासून स्वत:सह कुटुंबाचे संरक्षण म्हणून दक्षता बाळगावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी आरोग्य डॉ. एस. व्ही. मेहकरकर यांनी केले.
४५६ गावांमध्ये ग्रामसभेतून उष्माघाताबाबत जागृती !
By admin | Updated: April 22, 2017 00:06 IST