वाशिम : येथील रेल्वे स्थानकावरील मालधक्क्यावर सराईत व तडीपार असलेल्या आरोपीने एका इसमावर तलवारीने हल्ला करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना २९ एप्रिल रोजी दुपारी ४.३0 वाजताच्या सुमारास घडली. वाशिम रेल्वे माल धक्क्यावर गेल्या अनेक वर्षांपासून ट्रकचालक व मालकांकडून खंडणी वसूल केली जात असल्याची चर्चा आहे. ट्रकचालकाकडून खंडणी वसूल करण्यासाठी या ठिकाणी स्पर्धा लागली असल्याचे सर्वश्रुत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना ट्रकचालक व मालक अक्षरश: कंटाळून गेले आहेत; मात्र यावर कुणाचेही अंकुश नसल्याने त्यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दरम्यान, २९ एप्रिल रोजी दुपारी ४.३0 वाजताच्या सुमारास रेल्वे स्टेशनवरील मालधक्यावर एका तडीपार आरोपीने मोहम्मद मोईजोद्दीन यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले; परंतु पैसे न दिल्यामुळे त्याच्यावर चार ते पाच साथीदाराच्या सहकार्याने सशस्त्र हल्ला केला. यामध्ये मो. मोईजोद्दीन हा गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्यावर अकोला येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची तक्रार देण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात जखमीचे नातेवाईक गेले होते. घटनास् थळ रेल्वे पोलिसांच्या हद्दीत असल्याने सांगून पोलिसांनी तक्रार नोंदविली नाही.
तडीपार आरोपीचा इसमावर सशस्त्र हल्ला
By admin | Updated: April 30, 2015 01:46 IST