वाशिम : शहरातील रस्त्यावर वाटेल तेथे वाहने उभी करून तासन्तास गायब होणार्या वाहनाधारकांमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पोलीस विभागाच्यावतीने याची दखल घेत रस्त्यांवरील वाहनांवर धडक कारवाई मोहीम २२ सप्टेंबरपासून हाती घेण्यात आली. पहिल्याच दिवशी रस्त्यावर उभे असलेल्या २९ वाहने उचलून नेण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी वाहनारकांची मात्र एकच धांदल उडाली होती. पोलीस विभागाच्यावतिने परिवीक्षाधिन उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कांबळे व शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक राहुल जगदाळे यांनी शहरातील रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहने उचलून ट्रकमध्ये भरुन ठाण्यात जमा केली. शहरातील सर्वात गजबजलेला चौक म्हणून पाटणी चौक. या चौकात नेहमीच वर्दळ राहते. या रस्त्यावर फेरीवाल्यांसह काही दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने खरेदीसाठी येणार्या नागरिकांना आपली वाहने रस्त्यावर लावण्यसाशिवाय पर्याय नाही. पे अँन्ड पार्कीगची व्यवस्था असतानासुद्धा वाहनधारक तिकडे न जाता रस्त्यावर वाहने उभी करीत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत होता. पोलीस विभागाच्यावतिने याबाबत धडक मोहीम राबवून रस्त्यावर उभी असलेली वाहने जप्त करण्यात आली. वाहनधारक वाहन उभे करुन निघून गेला परत आल्यानंतर आपले वाहन न दिसल्याने त्याची चांगलीच धांदल उडाली. आजुबाजुला चौकशी केल्यानंतर आपले वाहन वाहतूक शाखेच्यावतिने उचलून नेण्यात आल्यानंतर पायदळ जावून दंड भरुन वाहने सोडविण्यात आलीत. २२ सप्टेंबर रोजी एकूण २९ वाहनांवर कारवाई करुन ३६00 रुपये दंड वसूल करण्यात आला. २४ सप्टेंबर रोजी सुध्दा बहुतांश वाहनांवर कारवाई करण्यात आली असून सदर मोहीम अविरत सुरु राहणार असल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्याचे चिन्ह दिसून येत आहे.
अन् वाहनधारकांची उडाली धांदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2015 01:19 IST