वाशिम : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली विनोद जोगदंड यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सदर सभा जिल्हा परिषद सभागृहात पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सभापती चक्रधर गोटे, सुभाष शिंदे, ज्योती गणेशपुरे व पानूताई जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रत्येक विभागाच्या साहित्य खरेदीच्या दर कराराचा (आरसी) मुद्दा स्थायी समितीच्या सदस्यांनी उपस्थित केला. यावर यापुढे ई-निविदेनुसार सर्व व्यवहार करावे, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी केल्या. उस्मान गारवे यांनी दोन खासगी माध्यमिक शाळेच्या तपासणीबाबत काय झाले, याची माहिती विचारली असता माध्यमिक शिक्षणाधिकारी उपस्थित नसल्याने या प्रश्नाची माहिती मिळू शकली नाही. यावरून सदस्यांनी आक्रमक होत सर्व विभागाचे प्रमुख किंवा त्यांचे प्रतिनिधी सभेत उपस्थित राहण्याचा आग्रह धरला. पुढील सभेत विभाग प्रमुखांनी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले जातील, असे आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) योगेश जवादे यांनी दिले. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याने या सभेत कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यात आला नाही.
वाशिम जिल्हा परिषदेची सर्व कामे आता ई-निविदेनुसार
By admin | Updated: December 24, 2015 02:44 IST