वाशिम: शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध सामाजिक अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थींच्या कागदपत्रांची पडताळणी प्रशासनाकडून केली जात आहे. त्यात शेकडो लाभार्थी अपात्र असल्याचे आढळून येत आहे. मंगरुळपीर तालुक्यात ही मोहीम वेगात सुरू असून, वाशिम तालुक्यात या मोहिमेला लवकरच सुरुवात केली जाणार आहे, तर इतर तालुक्यातही कार्यक्रमाची आखणी झाली आहे.
शासनाकडून संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा निवृत्ती वेतन, दिव्यांग अर्थसहाय्य योजनेस विविध योजना राबविल्या जातात. वाशिम जिल्ह्यात या सर्व योजनांचे मिळून ९५ हजारांपेक्षा अधिक लाभार्थी आहेत. तथापि, योजनांचा लाभ घेणारे लाभार्थी खऱ्या अर्थाने पात्र आहेत की नाही किंवा प्रत्यक्ष एखादा पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहे काय, याची पडताळणी करण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मंगरुळपीर तालुक्यात १९ जानेवारीपासून ही मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेत विधवा निवृत्ती योजनेतील लाभार्थीकडून मुलाच्या वयाचे प्रमाणपत्र, हयातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, शेती आहे काय, इतर कोणत्या योजनांचा लाभ घेतला जात आहे, आदि कागदपत्रे मागविण्यात आली. इतरही योजनांत उत्पन्नाचा दाखला, निराधार असल्याचे प्रमाणपत्र, हयातीच्या दाखल्यासह इतर आवश्यक कागदपत्रे मागविण्यात येत आहेत. प्रत्येक गावात ही मोहीम राबविली जात असून, आजवर शेकडो लाभार्थी अपात्र किंवा बोगस असल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट होत आहे.