अकोला : अनधिकृत लॉटरी विक्रेत्यांविरुद्ध कारवाईचे आदेश राज्य शासनाच्या वित्त विभागाने जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. अनधिकृत लॉटरी विक्रीमुळे शासनाचा महसूल बुडतो. शासनाच्या आदेशामुळे अनधिकृत लॉटरी तिकीट विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. सणानिमित्त लॉटरी तिकिटांची विक्री जास्त होते. त्यामुळे बाजारात अनधिकृत लॉटरी तिकिट विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नागरिकांची तर फसवणूक होतेच, शिवाय शासनाचा महसूलही बुडतो. लॉटरी तिकिटांची विक्री करण्यापूर्वी लॉटरी योजनेची महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालयात नोंद करणे आवश्यक असते. नोंदणी झाल्यानंतर शासनाकडून अधिकृत लॉटरी योजनेची यादी प्रकाशित करण्यात येते. दरम्यान, राज्य शासनाच्या वित्त विभागाने २२ ऑक्टोबरला अधिकृत लॉटरी योजनांची यादी प्रकाशित केली. यामध्ये महाराष्ट्राच्या २७ योजनांसह मिझोराम, सिक्किम, गोवा राज्याच्या लॉटरी योजनेचा समावेश आहे. शासनाने प्रकाशित केलेल्या लॉटरी योजनेव्यतिरिक्त अन्य लॉटरी तिकिटाची राज्यात विक्री होत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश वित्त विभागाने दिले आहेत. ही कारवाई महसूल आणि पोलिस प्रशासनाला करावयाची आहे.
अनधिकृत लॉटरी विक्रेत्यांवर होणार कारवाई
By admin | Updated: October 27, 2014 00:00 IST