वाशिम : कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणाला सर्वाधिक प्राधान्य दिली जात आहे. त्यामुळे लसीकरणाच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई होणार नाही, याची दक्षता घ्यावी. या कामामध्ये हयगय करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी शुक्रवारी दिला. मानोरा तालुक्यातील लसीकरण मोहिमेचा आढावा घेताना ते बोलत होते.
यावेळी सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, प्रभारी तहसीलदार संदेश किर्दक, तालुका आरोग्य अधिकारी सागर जाधव, प्रभारी गटविकास अधिकारी शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. ही लाट रोखण्यासाठी जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम अधिक गतीने राबवून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले. लसीकरण मोहीम अधिक गतिमान करण्यासाठी ग्रामीण भागात अधिक जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. यासाठी ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावेत. तसेच लोकांसाठी सोयीस्कर ठरणाऱ्या ठिकाणी व वेळेत लसीकरण सत्राचे आयोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
०००००००००००
तालुकानिहाय आढावा घेणार
ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करावे. तलाठी, ग्रामसेवक, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांनी घरोघरी जाऊन अद्याप लस न घेतलेल्या व्यक्तींचा सर्व्हे करावा तसेच या व्यक्तींना कोरोना लसीकरण मोहिमेचे महत्व पटवून देऊन त्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. यापुढे लसीकरण मोहिमेचा नियमितपणे तालुकानिहाय आढावा घेतला जाणार असून कमी लसीकरण असलेल्या गावांचे तलाठी, ग्रामसेवक व इतर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचा स्वतंत्रपणे आढावा घेतला जाईल. लसीकरण मोहिमेच्या कामात हयगय केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिला.