- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज वर्तविला जात असल्याने, जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग आतापासूनच अॅक्शन मोडवर आला आहे. आरोग्य विभागाने जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांची मोट बांधण्याला सुरुवात केली असून, प्राथमिक टप्प्यात २४० बेड्सची तयारी करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत जनजीवन प्रभावित होत आहे. दुसरी लाट ओसरणे अद्याप बाकी असतानाच, तिसऱ्या लाटेचा अंदाजही तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका संभवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी बालरोगतज्ज्ञांची ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याला प्राधान्य दिले जात असून, वाशिम जिल्ह्यातही टास्क फोर्ससंदर्भात प्रशासन अॅक्शन मोडवर आहे. पहिल्या लाटेत जिल्ह्यात एकाही बालकाला कोरोना संसर्ग झाला नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. दुसऱ्या लाटेत १८ वर्षांखालील कोरोनाचे २१५० रुग्ण असून, यामध्ये १० वर्षांखालील ८६० रुग्णांचा समावेश आहे. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांची संख्या १ लाख ५२ हजार १९० होती. मागील आठ वर्षांत जिल्ह्यात ८९ हजार २९८ बालकांचा जन्म झाला. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना प्रभावित करण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी आरोग्य यंत्रणेसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना तालुक्यातील बालरोगतज्ज्ञांची बैठक घेण्याच्या सूचना दिल्या. बालकांमधील कोरोना रोखण्यासाठी विविध प्रकारचे लसीकरण, पोषण आहार वितरण, बेड्सची उपलब्धता यासंदर्भात ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील कोविड हॉस्पिटलमध्येदेखील १०० बेड्स उपलब्ध केले जाणार असून, खासगी बालरोगतज्ज्ञांनीदेखील २४० बेड्स उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे.
बालकांना कोरोनापासून सुरक्षित कसे ठेवावे, याबाबत मार्गदर्शकाच्या भूमिकेत आरोग्य विभाग व बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्स राहणार असून, पालकांनीदेखील पुढील चार महिने बालकांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
बालरोगतज्ज्ञांची मोट बांधणार; ‘सीएस’ने घेतली बैठक !
तिसऱ्या लाटेपासून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आतापासूनच शहरासह जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञांची मोट बांधण्यावर आरोग्य विभागाने भर दिला आहे. या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक (सीएस) डॉ. मधुकर राठोड यांनी २२ मे रोजी शहरासह जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञांची बैठक जिल्हा सामान्य रुग्णालय येथे घेतली. तिसरी लाट रोखण्यासाठी तसेच बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना कराव्या, बेड्ची उपलब्धता, नियमित लसीकरण आदी विषयांवर चर्चा झाली. यावेळी बालरोग तज्ज्ञांनी २४० बेड्स तयारी दर्शविली आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले.
बालकांच्या लसीकरण, रोगप्रतिकारशक्तीवर भर !
वयाच्या १० वर्षांपर्यंत बालकांचे विविध प्रकारे लसीकरण केले जाते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत बालकांच्या लसीकरणात खंड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तिसरी लाट येण्यापूर्वी बालकांना आवश्यक असलेल्या लसी वेळेतच देण्यात याव्या, पालकांनीदेखील जागरूक राहून पाल्यांचे लसीकरण करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले. कोरोना संसर्गाला बळी पडू नये म्हणून बालकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावरही भर द्यावा, अशा सूचनाही आरोग्य विभागाने केल्या.