वाशिम : जिल्ह्यात १५ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. आता सात महिने उलटून गेले तरी जिल्ह्यातील ६३.२७ टक्के लाेकांनी अद्याप कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतला नाही, तर दोन डोस घेणाऱ्यांचे प्रमाणही केवळ १३ टक्के आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर नागरिक कोरोना लसीकरणाबाबत गंभीर राहिले नसून, आता लसीकरण केंद्र ओस पडल्याचे चित्र दिसत आहे.
जिल्ह्यातील १३ लाख ७४ हजार ७३५ लोकसंख्येपैकी १० लाख १३ हजार १८० नागरिकांना कोरोना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्षात १५ जानेवारीपासून या लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. आरोग्य, महसूल, पंचायत, पोलीस विभागासह विविध प्रशासकीय विभागांतील कोरोना योद्ध्यांना लसीकरणात प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर ६० वर्षे व त्यावरील वयाचे ज्येष्ठ नागरिक, तसेच ४५ ते ५९ वर्षे वयाेगटातील दुर्धर आजारग्रस्त नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले, तर आता १८ वर्षे व त्यावरील सर्वच वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. मे महिन्याच्या मध्यंतरापर्यंत या लसीकरणाच्या मोहिमेला प्रतिसाद मिळत होता; परंतु त्यानंतर कोरोना संसर्ग नियंत्रित होऊ लागल्याने लसीकरणाबाबत नागरिक गंभीर राहिले नसून, लसीकरण केंद्र ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
-------------------
आवश्यक प्रमाणात लाभार्थ्यांसाठी प्रतीक्षेची वेळ
कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्याने नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ केली आहे. त्यामुळे लसींच्या वेस्टेज मायनसचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लसीच्या एका व्हायलमधून १० ते १२ लोकांना लस देणे अपेक्षित असते. त्यामुळे व्हायल वापरात घेण्यापूर्वी आवश्यक प्रमाणात लाभार्थ्यांची संख्याही पडताळण्याची वेळ लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांवर आली आहे.
----------------
तिसऱ्या लाटेच्या धोक्याकडे दुर्लक्ष
जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली असली तरी, तिसऱ्या लाटेचा धोका वाढू लागला आहे. राज्यात अनेक ठिकाणी आता कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे; परंतु जिल्ह्यातील नागरिक कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेबाबत फारसे गंभीर नसून, याचा मोठा विपरीत परिणाम होण्याची भीती आहे.
--------------------
कोट :
जिल्ह्यात आवश्यक प्रमाणात लसींचे डोस उपलब्ध असून, नागरिकांचे लसीकरण तातडीने पूर्ण करण्याची धडपड सुरू आहे. तथापि, कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्याचे दिसत असल्याने नागरिक लसीकरणाबाबत उदासीन झाल्याचे वाटू लागले आहे. त्यामुळे लसीकरणाच्या अपेक्षित प्रमाणात वाढत नाही.
- डॉ. मधुकर राठोड,
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम
--------------------------
- जिल्ह्याची लोकसंख्या - १३, ७४,७३५
- लसीकरणाचे उद्दिष्ट - १०,१३,१८०
- पहिला डोस घेणारे - ३,६७,०८७
- दुसरा डोस घेणारे - १,३१,७४६
--------------------------
लसीकरणाची तालुकानिहाय स्थिती
तालुका - उद्दिष्ट - पहिला डोस - दुसरा डोस
वाशिम - २१११०३ - ७७५२४ - ३५९४४
कारंजा - १७६८७३ - ७१९४४ - २८९४५
मंगरूळपीर - १४४९४० - ५५५३२ - २१३८६
रिसोड - १७१६९१ - ३५८२१ - १०८०५
मालेगाव - १७२६०५ - ४३७५४ - १४२८०
मालेगाव - १३५९६८ - ४३७५४ - १४२८०